आणे पठारावरील टॉवर मुळे मधील सर्व बाधित शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा
1 min read
आणे दि.२९:- आणे (ता.जुन्नर) येथे ४४० के.व्ही.टॉवर लाईनच्या बाभळेश्वर ते कडुस या महत्वाकांक्षी प्रोजेक्टमुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन यामध्ये गेली असून काही शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी बैठक घेऊन विरोध केला आहे.
संबंधित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना तसेच सर्व अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे या निवेदनात म्हटले आहे की, पेमदरा, आणे, आनंदवाडी, नळावणे येथील शेतकऱ्यांच्या शेतात आपल्या कंपनीने विद्युत मनोरे उभारलेले आहेत.या विद्युत मनोऱ्यांखाली आमची वडिलोपार्जित तसेच खरेदीखताने घेतलेली मिळकत असून त्यामध्ये आमची पिके उभी आहेत.
आपल्या कंपनीने आम्हां शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे सदर विद्युत मनोऱ्यांवर तारा ओढण्याचे काम सुरू केले आहे.सदर कामामुळे आमच्या जमिनींचे तसेच शेतातील पिकांचे नुकसान झाले आणि होत असून आपले प्रतिनिधी फक्त पंचनामे करून आम्हां शेतकऱ्यांच्या सह्या घेत आहेत.
परंतु त्यानुसार आम्हांला नुकसान भरपाई देण्याबाबत मात्र सातत्याने टाळाटाळ केली जात आहे असे आम्हांला सत्कृत दर्शनी दिसून आले आहे. मागे काही वर्षांपूर्वी पठारावरील मौजे नळवणे येथील बाधित शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम दिली गेली होती परंतु आजच्या बाजारभावाचा विचार करता आपल्या कंपनीने आम्हां शेतकऱ्यांची फसवणूक केली
असल्याचे आमचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे आमच्या जमिनी पूर्वी जिरायत गणल्या जात होत्या परंतु आता आमच्यातील काही शेतकऱ्यांनी शेततळी बांधून, विहिरी खोदून सिंचनाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आमचे क्षेत्र बारमाही बागायत म्हणून कसत आहोत,शिवाय आम्ही स्व:खर्चाने फळबागा उभारल्या आहेत.
आजमितीस आपल्या कंपनीने उभारलेल्या मनोऱ्यांखालील जमिनी तर आम्हांला गेल्या 10 ते 15 वर्षांपासून पडीक ठेवाव्या लागल्या आहेतच परंतु ज्यांनी फळबागा पिकविल्या आहेत तेथील क्षेत्र सुद्धा तारांखाली बाधित झाल्याने आमच्या हक्काच्या उत्पन्नाची होळी होण्याची,उपासमारीची वेळ आपल्या कंपनीने आमच्यावर आणली आहे.
ही बाब आम्हां पठारच्या शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. एकंदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हाती घेतलेल्या ड्रीम प्रोजेक्टमुळे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक धोरणाचे कल्याण होणार आहे, परंतु या ४४० के.व्ही.टॉवर लाईनच्या बाभळेश्वर ते कडुस या महत्वाकांक्षी प्रोजेक्टमुळे आमच्या संसाराची मात्र राखरांगोळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आमच्या अशीही बाब निदर्शनास आलेली आहे की,जुन्नर तालुक्यातील मौजे-आळे येथील शेतकऱ्यांनी मोठे जनआंदोलन उभारले व कडवट पद्धतीने विरोध दर्शविला तेथे मात्र आपल्या कंपनीने यथोचित पद्धतीने मोबदला तेथील बाधित शेतकऱ्यांना दिला आहे परंतु त्याच वेळी मात्र आम्हांला सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे
असा आम्ही आपल्यावर आरोप करत आहोत व वस्तुस्थिती देखील खरी आहे.खरे तर त्यामुळेच आम्ही बाधित शेतकऱ्यांनी दि.26 रोजी एकत्र येऊन मौजे आणे (ता. जुन्नर) येथील बैठकीत असा ठराव मंजूर केला आहे की, आपल्या कंपनीकडून अशा प्रकारे मनमानी पद्धतीने चालवलेल्या कामाला आमचा १००% विरोध असून
यापुढील काळात सर्व बाधित शेतकऱ्यांचे पंचनाम्याचे काम पूर्ण करणे तसेच पंचनाम्यानंतर जोपर्यंत मोबदला प्रत्यक्ष रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत हे तारा ओढण्याचे काम थांबविण्यात यावे.सदरचे काम आमच्या विनंतीचा मान ठेवून न थांबविल्यास नाईलाजात्सव आम्हांला रास्तारोको
आंदोलन करून प्रखर विरोध करण्याची वेळ आमच्यावर आणू नये.तशी वेळ आमच्यावर आल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल व चर्चेची द्वारे खुली न ठेवता काम सुरू ठेवल्यास होणाऱ्या परिणामांस आपली कंपनी असून हे शासन शेतकरी विरोधी आहे असा सूर न उमटू देण्याची जबाबदारी आपली असेल याची नोंद घ्यावी.
