राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार बाबाजी बांगर यांना जाहीर

1 min read

आळेफाटा दि.२१:- सत्यशोधक भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान, उमरखेड (जि. यवतमाळ) यांच्या वतीने दिला जाणारा २०२६ सालचा राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार बोरी (साळवाडी) ता.जुन्नर येथील प्रगतशील शेतकरी बाबाजी बांगर यांना जाहीर करण्यात आला आहे.नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब, शेतकरी गट स्थापन करून शेतकऱ्यांना एकत्र आणणे तसेच शेतीत नविन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याबद्दल बाबाजी बागार यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांनी स्वतःच्या शेतीत विविध प्रयोग करून उत्पादन खर्चात बचत करत उत्पन्न वाढीचा आदर्श इतर शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. नैसर्गिक शेतीचे मास्टर ट्रेनर म्हणून बांगर काम करत आहेत बाबाजी बांगर यांनी आत्मा कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली पाचट व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा वापर, शेतीतील शाश्वत पद्धती यावर भर दिला आहे. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शासनाच्या विविध कृषी योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.सत्यशोधक भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी राज्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षीचा हा पुरस्कार दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.या निवडीबद्दल बाबाजी बांगर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ व कृषी क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!