अशोक खरातकडे कोट्यवधींची ‘माया’; बडे अधिकारी रडारवर?
1 min read
नाशिक दि.२०:- नाशिकमधील स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याच्यावर महिला अत्याचाराचे गंभीर आरोप झाल्या नंतर आता विशेष तपास पथकाने या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला आहे. डिजिटल पुरावे आणि फॉरेन्सिक तपासाच्या आधारे खरातचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीसांनी कंबर कसली आहे.
एसआयटीकडून सध्या खरातचे फोन कॉल्स, चॅट्स आणि सोशल मीडिया अकाऊंट्सची कसून चौकशी केली जात आहे.पोलिसांच्या हाती लागलेल्या धक्कादायक व्हिडियों मधील पीडितांना न्याय मिळवून देणे, हा तपासाचा प्राथमिक उद्देश आहे.
या व्हिडिओंमध्ये दिसणाऱ्या महिलांची ओळख पटवून त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती मिळत आहे.तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खरातच्या तथाकथित ‘दरबारात’ अनेक बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वावर होता.
धक्कादायक बाब म्हणजे,या अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावावर खरातने अनेक ठिकाणी जमिनींची खरेदी-विक्री केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची आणि ‘खरात नेटवर्क’ची साखळी पोलीस आता शोधून काढणार आहेत.
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील मोक्याच्या ठिकाणी खरातने मोठी गुंतवणूक केल्याची चर्चा आहे. यामध्ये प्रामुख्याने पाथर्डी-गवळाणे, सिन्नर परिसर, शिर्डी-ओझर पट्टा या परिसरात गुंतवणूक केल्याची चर्चा आहे.जप्त केलेले मोबाईल आणि लॅपटॉपचा डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे.
खरातला या काळ्या कृत्यात मदत करणाऱ्या त्याच्या साथीदारांची धरपकड होणार आहे. त्याला कोणी मदत करत होतं का? याचाही तपास सुरू आहे. बँकांचे व्यवहार आणि पैशाचा वापर यांची चौकशी होणार आहे. नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत नाशिक शहरातील कॅनडा येथील एका इमारतीमध्ये अशोक खरात
याच्या कार्यालयात आपल्यावर अत्याचार झाल्याचे एका पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. खरात याने फिर्यादी महिलेचा भावनिक, धार्मिक विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला मंत्र-तंत्राच्या विधीसाठी कार्यालयात बोलावून तिला गुंगीकारक पदार्थमिश्रित पाणी पाजले.
संमोहित अवस्थेत २ पीडिता गेल्यानंतर तिला तिच्या पतीच्या मृत्यूची भीती घालून आणि आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन खरातने वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
