पुण्यात पोलीस अधिकाऱ्याने लॉजमध्ये विष प्राशन करून आयुष्य संपवलं; पोलीस दलात उडाली खळबळ
1 min read
पुणे दि.८:- महाराष्ट्र पोलीस दलातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. सांगली पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका तरुण पोलीस अधिकाऱ्याने पुण्यात विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. सुरज मराठे असे या २५ वर्षीय सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव असल्याची माहिती आहे.
त्यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सुरज मराठे हे सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर नियुक्त होते. गेल्या काही काळापासून त्यांना गुडघ्यांचा तीव्र त्रास होत होता.
याच शारीरिक व्याधीवर उपचार घेण्यासाठी त्यांनी रजा घेतली होती आणि ते पुण्यात आले होते. पुण्यातील डेक्कन परिसरातील एका लॉजमध्ये ते थांबलेले होते. उपचार घेतल्यानंतर ते लॉजवर परतले त्यानंतर त्यांनी विष प्राशन केल्याची माहिती आहे. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सुरज मराठे यांचे कुटुंबीय पुणे जिल्ह्यातील देहू येथे राहतात. अत्यंत कमी वयात पोलीस दलात अधिकारी पदावर झेप घेणाऱ्या या तरुण अधिकाऱ्याने केवळ शारीरिक त्रासामुळे आयुष्य संपवल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोलीसांना एक सुसाईड नोट सापडली असून,
त्यात त्यांनी आपल्या आजारपणाचा उल्लेख केला आहे. सध्या डेक्कन पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. एका उमद्या अधिकाऱ्याच्या अशा जाण्याने सांगली आणि पुणे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.
