ऊसाला तुरे आल्याने जुन्नर तालुक्यातील ऊसाचा गोडवा घटला

1 min read

बेल्हे दि.५:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर सध्या नवं संकट कोसळले आहे. ऊसाला लागलेल्या तुऱ्यामुळे शेतीचे नुकसान झाल्याच चित्र दिसत आहे. यामुळे ऊसाच्या वजनात घट होऊन ऊसाचा गोडवा कमी होत आहे. या वर्षीच्या बदलत्या हवामानामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर हे संकट आलं असल्याचं शेतकरी सांगत आहेत. दाट घुके, ढगाळ हवामान, पाऊसाचा फटका ऊसाला मोठ्या प्रमाणात बसला आहे.तुरा आल्याने उसाच्या वजनात २५ ते ३० टक्के घट होत आहे. ऊसाला तुरा आल्यानंतर जर उस एक महिन्याच्या आत कारखान्यांनी गाळप केले नाही तर वजनात जास्त प्रमाणात घट येत नाही परंतु जसजसे गाळपासाठी दिवस जास्त जातील तशी घट मोठ्या प्रमाणात येत असते. जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात जवळपास एकूण उसाच्या ४० ते ४५ टक्के उसाला तुरे आलेले दिसून येत आहे. याचे गाळप लवकर होणे शक्य नसल्याने याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागणार आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना नगदी पिकांना मोठ्या प्रमाणात फवारणीचा खर्च वाढलेला आहे. त्यातच हुकमी पैसे मिळवून देणारे पीक म्हणून ऊस पिकाकडे पाहिले जाते परंतु त्याच्यावर आलेल्या या पुढच्या संकटाने शेतकरी मोठ्या प्रमाणात हतबल झालेला दिसून येत आहे.
———————

यामुळे येतो ऊसाला तुरा

( नत्राचा पुरवठा कमी झाल्याने उसाची वाढ थांबते तसेच पाणी पातळी वाढल्याने नत्राची मात्रा कमी होते. त्यामुळे नत्राचे शोषण मुळांद्वारे योग्य प्रकारे होत नाही. पोटॅश जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे उसास लवकर तुरा येतो. ऊस लागवड करताना अगोदर पाचट जाळल्यास जास्त तुरा येतो. पूरस्थिती असलेल्या नदी काठावरील ऊसाला हमखास तुरा येतो. हवेतील आद्रतेचे प्रमाण व जमिनीत दीर्घ काळ पाणी राहिल्यास तुऱ्याचे प्रमाण साठ ते सत्तर टक्के आढळते. एकंदरीतच रात्रीचे आणि दिवसाचे तापमान, हवेतील आद्रता, सातत्याने पडणारा पाऊस, पाण्याचा निचरा न होणे, चुकीचा लागवड हंगाम यामुळे उसाला तुरा येऊ शकतो.)

——————-

ऊसाला तुरा येणे टाळण्यासाठी सुरु लागवड १५ डिसेंबर ते फेब्रुवारी पूर्वहंगामी १५ ऑक्टोबर ते नोव्हेंबर आणि आडसाली १५ जुलै ते १५ ऑगस्ट मध्ये करावी. जुलै व ऑगस्ट महिन्यात पाणी पातळी नियंत्रित ठेवावी.अति पावसामुळे युरिया च्या माध्यमातून दिलेल्या खतांचा निचरा होतो. अशा परिस्थितीत १५ जुलै पूर्वी अमोनियम सल्फेट खताचा ५० किलो प्रति एकरी ज्यादा हप्ता द्यावा, यामुळे ऊसाची वाढीची अवस्था कायम राहून फुलोरा येण्यास प्रतिबंध होईल. एकंदरीतच उसाला तुरा येऊ नये म्हणून शिफारशीप्रमाणे वेळेतच लागवड करावी पाणी आणि खतांचा योग्य वापर करावा”.

प्रशांत शेटे
प्रमुख व वरिष्ठ शाश्रज्ञ
कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव
——————–

“ऊसाला तुरा आल्यानंतर शेतकऱ्याचं थेट आर्थिक नुकसान होतं. उसाची वाढ थांबते, वजन घटतं आणि उतारा (रिकव्हरी) कमी होतो. साखर कारखान्याला असा उस कमी उपयोगाचा ठरतो. तुरा आलेला उस कडक व पोकळ होतो, रस कमी निघतो, त्यामुळे दर कमी मिळतो. काढणी लांबली तर नुकसान आणखी वाढतं. एकरी उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्याच्या मेहनतीचा खर्चही निघत नाही.

विकास चव्हाण
प्रगतशील ऊस उत्पादक, शेतकरी, पारगाव
————–

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!