शिर्डी महोत्सवात साईचरणी २३ कोटींचे दान ; ९ दिवसांत ८ लाख भाविकांची मांदियाळी

1 min read

शिर्डी दि.४:- शिर्डीतील नाताळ सुट्टी व नववर्ष स्वागत महोत्सवाच्या अवघ्या नऊ दिवसांच्या कालावधीत साईबाबांच्या चरणी तब्बल २३ कोटी २९ लाख रुपयांचे भरघोस दान अर्पण करण्यात आले असून, ८ लाखांहून अधिक भाविकांनी साईसमाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला. दि. २५ डिसेंबर २०२५ ते ०२ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या उत्सवाबाबतची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी दिली. गाडीलकर म्हणाले, नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त दि. २५ डिसेंबर २०२५ ते ०२ जानेवारी २०२६ या काळात दानपेटीतून ६ कोटी ०२ लाख ६१ हजार ००६ रुपये, देणगी काउंटरद्वारे ३ कोटी २२ लाख ४३ हजार ३८८ रुपये, पी.आर.ओ. सशुल्क पासद्वारे २ कोटी ४२ लाख ६० हजार रुपये, डेबिट/क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक/डीडी व मनी ऑर्डरद्वारे १० कोटी १८ लाख ८६ हजार ९५५ रुपये; तर विविध २६ देशांच्या परकीय चलनाद्वारे १६ लाख ८३ हजार ६७३ रुपये, अशी एकूण २२ कोटी ०३ लाख ३५ हजार ०२२ रुपये देणगी रोख स्वरूपात प्राप्त झालेली आहे.तसेच, ३६ लाख ३८ हजार ६१० रुपये किमतीचे सोने (२९३.९१० ग्रॅम) व ९ लाख ४९ हजार ७४१ रुपये किमतीची चांदी (५ किलो ९८३ ग्रॅम) देणगी स्वरूपात प्राप्त झालेली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी श्री साईबाबांच्या चरणी ६५५ ग्रॅम वजनाचा, आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण-हिरेजडित मुकुट अर्पण करण्यात आला.सदर मुकुटाची अंदाजे किंमत सुमारे ८० लाख रुपये असून, त्यामध्ये ५८५ ग्रॅम शुद्ध सोने व १५३ कॅरेटचे मौल्यवान हिरे आहेत. अशा प्रकारे विविध माध्यमांतून अंदाजे एकूण २३ कोटी २९ लाख २३ हजार ३७३ रुपये देणगी संस्थानाला प्राप्त झालेली आहे.महोत्सव कालावधीत श्री साईप्रसादालयात ६ लाखांहून अधिक साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला, तर १ लाख ०९ हजारांहून अधिक साईभक्तांनी अन्नपाकिटांचा लाभ घेतला आहे. याबरोबरच ७ लाख ६७ हजार ४४४ लाडू प्रसाद पाकिटांची विक्री करण्यात आली असून, याद्वारे २ कोटी ३० लाख २३ हजार ३२० रुपये प्राप्त झालेले आहेत. तसेच ५ लाख ७६ हजार ४०० साईभक्तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला.श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्राप्त झालेल्या दानाचा विनियोग हा श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालय, श्री साईप्रसादालय (मोफत भोजन), संस्थानच्या विविध शैक्षणिक संस्था, बाह्य रुग्णांच्या चॅरिटीकरिता, तसेच साईभक्तांच्या सुविधेकरिता उभारण्यात येणारे विविध उपक्रम आणि सामाजिक कामांकरिता करण्यात येत असल्याचेही गाडीलकर यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!