सह्याद्री व्हॅलीत ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ जयंती उत्साहात साजरी
1 min read
राजुरी दि.४:- येथील सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सेमिनार हॉलमध्ये आयोजित या विशेष कार्यक्रमात विद्यार्थी आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी प्रा. निश्चित कल्पना, प्रा. मेश्राम आणि चिन्मय देशपांडे यांनी आपले विचार व्यक्त केले. वक्त्यांनी सावित्रीबाईंच्या संघर्षाचा उल्लेख करत,
आजच्या काळात तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात महिलांची असलेली प्रगती हे सावित्रीबाईंनी पेरलेल्या शिक्षणरूपी बीजाचेच फलित असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे खजिनदार सचिन चव्हाण आणि उपप्राचार्य पी. बालारामडू आणि महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नेटके नियोजन आणि आयोजन ग्रंथपाल उद्धव भारती आणि प्रा. वैभव नांगरे यांनी केले होते. सावित्रीबाईंनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची ज्योत कशी पेटती ठेवली, याचे दर्शन या कार्यक्रमातून घडवण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उपस्थित सर्वांनी सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला.
