अहिल्यानगर महापालिका निवडणूक; राष्ट्रवादी काँग्रेसने खाते उघडले, दोघे बिनविरोध…
1 min read
अहिल्यानगर दि.२:- महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कुमारसिंह वाकळे व प्रकाश भागानगरे हे दोघे बिनविरोध निवडून आले आहेत. या दोघांच्या विरोधातील इतर उमेदवारांचे अर्ज बाद झाले किंवा त्यांनी माघार घेतली. त्यामुळे दोघांचे एकमेव अर्ज शिल्लक राहिले आहेत.
दरम्यान, गुरुवारी उमेदवारी एकूण २८ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. शुक्रवारी दि.२ अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे आणखी कोणी उमेदवार बिनविरोध होते का, याकडे नगरकरांचे लक्ष आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग ८ ड मधील उमेदवार कुमारसिंह वाकळे व प्रभाग १४ अ मधील उमेदवार
प्रकाश भागानगरे हे दोघे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या बिनविरोध निवडीची आता केवळ औपचारिकता शिल्लक आहे. वाकळे व भागानगरे हे यापूर्वीही नगरसेवक होते.महापालिकेच्या १७ प्रभागातील ६८ जागांसाठी ४७७ उमेदवारांचे ७८८ अर्ज दाखल झाले होते.
त्यापैकी छाननी मध्ये १७ अर्ज अवैध ठरले तसेच अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी आज एकूण २८ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार बिनविरोध ठरले. कुमार वाकळे यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवार पोपट कोलते यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
त्यामुळे वाकळे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला तर प्रभाग १४ मधील प्रकाश भागानगरे यांच्या विरोधातील चारही प्रतिस्पर्ध्यांनी माघार घेतली. त्यामध्ये मळू गाडळकर, ऋषिकेश रासकर, अवधूत फुलसौंदर व हरीश भांबरे यांचा समावेश आहे. हे चौघेही अपक्ष उमेदवार होते.
शिवसेनेचे ६ उमेदवार आता अपक्ष शिवसेनेच्या (शिंदे गट) ६ उमेदवारांचे पक्षाच्या वतीने दाखल झालेले अर्ज अवैध ठरले आहेत मात्र त्यांचे अपक्ष अर्ज वैध ठरल्याने त्यांची उमेदवारी कायम असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले. अनुमोदकाची खोटी सही असल्याने प्रभाग ८ मधील शिवसेनेचे उमेदवार राहुल कातोरे यांचा अर्ज अवैध ठरला.
त्यांनी याच जागेवर अपक्ष अर्ज भरलेला नव्हता. मात्र त्यांची दुसऱ्या जागेवरील अपक्ष उमेदवारी कायम आहे. प्रभाग ६ मध्ये विशाल शितोळे यांनी एबी फॉर्म जोडलेला नसल्याने त्यांचा शिवसेनेकडून उमेदवारीचा अर्ज अवैध ठरला. याच प्रभागातील दुसरे उमेदवार अमित खामकर यांनी एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडल्याने
त्यांचा शिवसेनेचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला. प्रभाग १६ मध्ये हर्षवर्धन कोतकर व प्रभाग १७ मध्ये गौरी नन्नावरे यांच्या एबी फॉर्ममध्ये खाडाखोड असल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरले. प्रभाग १४ मध्ये शिवसेनेचे उमेदवार ऋषिकेश रासकर यांचाही अर्ज सूचकाची सही खोटी असल्याने अवैध ठरला. या उमेदवारांचे अपक्ष अर्ज वैध ठरले आहेत.
प्रभाग १४ मधील काँग्रेसच्या दोन उमेदवारांचे पक्षाचे अर्ज अवैध ठरले. त्यांचे अपक्ष अर्ज कायम आहेत. दरम्यान, प्रभाग १५ मधील भाजपचे उमेदवार दत्तात्रय गाडळकर व सुजय मोहिते यांच्या अर्जावरही आक्षेप घेण्यात आले होते.
गाडळकर यांनी थकबाकी बाबत चुकीची माहिती दिल्याचा आक्षेप आहे. तर मोहिते यांच्या अतिक्रमणाबाबत आक्षेप होता. या दोन्ही अर्जांवर रात्री उशिरा सुनावणी झाली. यात दोन्ही अर्ज वैध ठरवण्यात आले.
