शाकंभरी पौर्णिमा….जिथे भाजीपाला अर्पण करतात श्री शाकंभरी बनशंकरी देवी शक्तीपीठ
1 min read
बागलकोट दि.२:- कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्याच्या सुपीक आणि पवित्र भूमीत बदामीजवळील चोलचागुड्डा या शांत गावात एक प्राचीन दिव्य शक्तीपीठ विसावले आहे बनशंकरी देवीचे मंदिर… तिलकरण्य जंगलाच्या गाभार्यात वसलेले हे मंदिर जरी बाहेरून साधेपणाने दिसते, तरी शेकडो वर्षांची परंपरा,
असंख्य भक्तांची श्रद्धा आणि देवीच्या अंतहीन करुणेने भारलेले वातावरण भक्तांना नेहमीच आकर्षित करत असते.. ‘बनशंकरी’ म्हणजे ‘वनातील शंकराची पत्नी’ वनदेवी, अरण्यातील शक्ती, निसर्गाशी एकरूप असलेले माता पार्वतीचे रूप; आणि ‘शाकंभरी’ म्हणजे ‘वनस्पतींची, शाकांची देवी’,
जी भूक, दुष्काळ आणि दारिद्र्य यामधून लोकांना तारते. म्हणूनच येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला ती पालनकर्ती म्हणून जाणवते….कथांमध्ये सांगितले जाते की, या प्रदेशात कधीकाळी दुर्गमासुर नावाच्या दैत्याने थैमान घातले होते. त्याच्या अत्याचारामुळे ढग कोरडे पडले, नद्या आटल्या आणि दुष्काळामुळे जमिनीला भेगा पडल्या.
जनावरांना चारा नव्हता, घराघरात उपासमार होती. देवता, ऋषी, साधू सारेच घाबरून देवीकडे गेले. तेव्हा पार्वतीने शाकंभरी रूप धारण केले… आईसाहेबांच्या शरीरावर पानांचे वस्त्र, डोळ्यात अपरंपार करुणा आणि हातात कामधेनू प्रमाणे जमिनीत अन्नधान्य…वृक्ष निर्माण करण्याची अद्भुत शक्ती. …तिने भक्तांच्या भुकेसाठी भाजीपाला,
धान्य, कंदमुळे उगवली; रानात पाणी निर्माण केले; आणि नंतर दुर्गमासुराचा संहार करून भूमीला पुन्हा सुपीक केले. त्या दिवसापासून ही भूमी बनशंकरीच्या आशीर्वादाने भरभराटली आणि लोकांनी तिला मातृस्वरूप मानून अनादि काळापासून पूजन केले.इतिहासात पाहिले तर या मंदिराचा उगम चालुक्यांच्या ७व्या शतकातील सुवर्णकाळात झाल्याचे संदर्भ सापडतात.
चालुक्य सम्राटांना कला, स्थापत्य आणि धर्माची विलक्षण जाण होती…. त्यांनी या जंगलात देवीचे शक्तीपीठ उभारले. मंदिराचे गर्भगृह द्रविड शैलीचे, तर शिखरात विजयनगर कालीन अलंकारिक कारागिरी जाणवते….काळ्या दगडात कोरलेली देवीची मूर्ती हे या मंदिराcha मुकुटमणी आहे. आठ हातांची माता, हातात त्रिशूल, खड्ग,
ढाल, वज्र आणि इतर आयुधे पराक्रम व संरक्षणाचे द्योतक. परंतु तिच्या चेहऱ्यावर अमर्याद शांतता आणि करुण भाव दिसतात ..देवी व्याघ्र किंवा सिंहावर आरूढ असून तिच्या पायाखाली दोन हत्ती कोरलेले आहेत. हत्ती म्हणजे सामर्थ्य व स्थैर्याचे प्रतिनिधित्व करतात तर त्यातूनच असा संदेश मिळतो की भक्तांच्या जीवनातील सर्व अडथळ्यांना देवी आपल्या चरणाखाली ठेवते, असा अर्थ स्थानिक लोक सांगतात.
मंदिराच्या सभोवताली तीन पवित्र तीर्थे आहेत अगस्तीतीर्थ, हरिद्रातीर्थ आणि तैलतीर्थ. अशी धारणा आहे की, देवीची कृपा मिळण्यासाठी प्रथम या तीर्थांमध्ये स्नान करून तन व मन शुद्ध करावे नंतर भस्म, कुंकू, अक्षता घेऊन मंदिरात प्रवेश करावा….जवळच चंडभैरवाचे एक छोटे मंदिर आहे, जो देवीचा सेनापती मानला जातो.
प्रत्येक भक्त प्रथम भैरवाचे अभिवादन करून नंतर मुख्य गर्भगृहात प्रवेश करतो.बनशंकरी देवीची उपासना पद्धत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे नवरात्रोत्सवात देवीला भाजीपाला अर्पण करण्याची प्रथा आहे. म्हणूनच तिला ‘शाकंभरी’ म्हणतात. शेंगादाणे, वांगे, दुधी, गवार, मुळा, नारळ गावकरी स्वतः शेतातले पिक आणून नैवेद्य
करतात…. त्यांचा विश्वास असतो की, “देवीला शाक दिले की घरात कधी अन्न कमी पडत नाही.” नवरात्रात मंदिर परिसर हिरव्या भाज्यांनी, फुलांनी आणि दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतो. हजारो स्त्रिया देवीच्या पायाशी ओटीभर धान्य ठेवतात….शुक्रवार हा देवीचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो.
त्या दिवशी सकाळपासून लोक रांगांमध्ये उभे दिसतात…. कोणी नवस फेडायला, कोणी नवस बोलायला, तर काही फक्त तिच्या विलक्षण दर्शनासाठी येतात…. असा विश्वास आहे की, बनशंकरी देवी भक्तांच्या मनातील भीती संपवते, धैर्य देते आणि शत्रूंचा पराभव करण्याची शक्ती देते. अनेक स्थानिक लोक सांगतात
की देवी त्यांच्या स्वप्नात येते, मार्ग दाखवते, संकटातून बाहेर काढते. कलियुगातही जो देव भक्ताला सोडत नाही, अशी लोकमान्यता या देवीबद्दल आहे….मंदिराची वार्षिक बनशंकरी जत्रा हा दक्षिण भारतातील एक मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. दूरदूरच्या गावांतून लोक बैलगाड्यांवरून, गाड्यांवरून, ट्रॅक्टरवरून देवीच्या
दर्शनासाठी येतात…. मंदिराचे रस्ते त्या काळात सुगंधी फुलांनी,रंगीबेरंगी सजावटीने आणि भक्तांच्या जयजयकाराने गजबजून जातात. ‘अम्मा, रक्षा कर’ (मराठीत भाषांतर )अशा हाका जागोजागी ऐकू येतात. देवीच्या प्रतिमेची भव्य पालखी निघते आणि गावभरून फिरते. त्या पालखीमागे हजारो भाविक चालतात तर काही तन्मयतेने नतमस्तक होतात….
मंदिराचे वातावरण अत्यंत शांत आणि प्रसन्न आहे. तिलकरण्यच्या दाट अरण्यातून वाहणारा मंद वारा, पक्ष्यांचे किलबिल, दूरवर दिसणारा बदामीचा लालसर दगडी पट्टा
हे सर्व मिळून मंदिराला एक रहस्यमय आध्यात्मिक तेज देते. सकाळच्या आरतीचे स्वर तर इतके माधुर्यपूर्ण असतात की मन नकळत शांत होते. अनेक साधक येथे ध्यानधारणा करतात. म्हणतात की, या परिसरात योगी, तपस्वी आणि साधूंनी अनेक वर्षे साधना केली.
बनशंकरी देवीचे महात्म्य केवळ इतिहासात किंवा पौराणिक कथांमध्ये नाही; तर लोकांच्या दैनंदिन जगण्यातही आहे. बागलकोटपासून बेळगाव पर्यंत, सोलापूरपासून सांगलीपर्यंत असंख्य कुटुंबांची कुलदेवी बनशंकरी आहे. परिसरातील शेतकरी पहिले पेरणी करण्यापूर्वी देवीच्या
पायाशी माती अर्पण करतात तर व्यापारी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी देवीच्या नावाने वडी किंवा गूळ देतात आणि स्त्रिया सौभाग्यासाठी ओटी ठेवतात. कित्येक नवविवाहित जोडपी आशीर्वादासाठी प्रथम येथेच येतात.
