मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहिम २४० वाहनचालकांवर कारवाई

1 min read

पुणे दि.२:- वर्षअखेर व नूतन वर्ष २०२६ च्या स्वागतानिमित्त नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो. या कालावधीत काही वाहनचालक मद्यप्राशन करून वेगात व धोकादायकरित्या वाहने चालवित असल्याने स्वतःच्या तसेच इतर नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर अशा वाहनचालकांवर वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचे आदेशाने तसेच पोलीस सह आयुक्त डॉ. राशीकांत महावरकर व अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांच्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक शाखेमार्फत विशेष मोहिम राबविण्यात आली.या मोहिमेअंतर्गत पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेतील १३ वाहतूक विभागांमार्फत एकूण ४७ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालविणारे २२० दुचाकीस्वार व २० चारचाकी वाहनचालक, असे एकूण २४० वाहनचालक आढळून आले. संबंधित वाहनचालकांविरोधात मा. न्यायालयात “ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह” अंतर्गत खटले दाखल करण्यात येत आहेत. यापुढेही अशाच प्रकारे विशेष मोहिमा राबविण्यात येणार असून वाहनचालकांनी मद्यप्राशन न करता वाहने चालवावीत व होणारी न्यायालयीन कारवाई टाळावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त विवेक पाटील, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!