श्री क्षेत्र कोरठण खंडोबा यात्रोत्सवाची जोरदार तयारी
1 min read
पिंपळगाव रोठा दि.२७:- पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) राज्यस्तरीय ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जाप्राप्त श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानाचा वार्षिक यात्रोत्सव यंदा ३ ते ५ जानेवारीदरम्यान भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. देवस्थानाच्या यात्रेच्या नियोजनासाठी विविध विभागांची महत्त्वाची प्रशासकीय बैठक देवस्थान जवळ पार पडली.
बैठकीत पोलिस, आरोग्य, बांधकाम, महावितरण, एसटी महामंडळ, जीवन प्राधिकरण आणि कृषी विभागांच्या अधिकाऱ्यांनी भाग घेतला. यात्राकाळात भाविकांच्या सोयी-सुविधा, वीजपुरवठा, पाणी व्यवस्था, आरोग्य सेवा, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्था याबाबत सविस्तर चर्चा झाली.
तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी विविध विभागांना स्पष्ट सूचना दिल्या, जेणेकरून यात्रोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडेल.कोरठण खंडोबा यात्रा राज्यभरातील भाविकांना आकर्षित करणारी असून, मानाच्या काठ्या, पालखी मिरवणुका आणि धार्मिक कार्यक्रम यामुळे ती विशेष वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रेच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात येत असून, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.बैठकीस अध्यक्षा शालिनी घुले, माजी अध्यक्ष अॅड. पांडुरंग गायकवाड, पोलिस निरीक्षक संतोष खेडकर, उपाध्यक्ष महेश शिरोळे, सरपंच सुरेखा वाळुंज, सचिव चंद्रभान ठुबे,
जालिंदर खोसे, अशोक घुले, संतोष वाळुंज, भाऊसाहेब गाडगे, साहेबराव वाफारे, गोरक्ष मदने, गोपीनाथ घुले,किरण शेलार, रामदास मुळे, रवींद्र राजदेव, प्रशांत घुले, सौरभ क्षीरसागर आदी उपस्थित होते.
