नऊ महिन्यात राज्यात ३३ हजार अपघात; १४ हजार जणांचा मृत्यू
1 min read
मुंबई दि.२७:- महाराष्ट्रात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने सातत्याने राबविलेल्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्यूदरात घट नोंदविण्यात आली आहे.जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या दरम्यान राज्यात एकूण ३३,००२ अपघात झाले.
त्यामध्ये १४,०६६ मृत्यू झाले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत ३२,७८४ अपघातात १४,१८५ मृत्यू झाले होते. तुलनात्मकदृष्ट्या पाहता, अपघातांची संख्या २१८ ने (०.६६ टक्के) वाढली असली तरी अपघाती मृत्यूंची संख्या ११९ ने म्हणजेच ०.८३ टक्क्यांनी घटली आहे. मृत्युदरातील ही घट रस्ता सुरक्षा उपाययोजनांचे यश दाखवते.
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरही जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ८२ अपघाती मृत्यू झाले होते, तर २०२५ मध्ये ही संख्या ६१ वर आली आहे. तसेच अपघातांची संख्या ६६ वरून ५४ इतकी कमी झाली आहे.रस्ता सुरक्षा उपायांमुळे काही जिल्ह्यांमध्ये मृत्यूंच्या संख्येत विशेष घट दिसून आली आहे.
नागपूर शहरात २१ टक्के, पालघरमध्ये २० टक्के, अमरावतीत १७ टक्के, पुण्यात १५ टक्के, धुळ्यात १४ टक्के तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १२ टक्क्यांनी अपघाती मृत्यू कमी झाले आहेत.राज्यातील रस्ता अपघातांची संख्या सन २०३० पर्यंत ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट परिवहन विभागाने निश्चित केले असून,
त्यासाठी भविष्यात रस्ता सुरक्षा उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व वाहनचालक व पादचारी नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहनही परिवहन विभागामार्फत करण्यात आले आहे.
