श्रीरामपूर शहरात कत्तलीच्या उद्देशाने डांबलेली ५ गोवंश जनावरे सुटका; १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

1 min read

श्रीरामपूर दि.२२:- श्रीरामपूर शहर पोलिसांनी धडक कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे बांधून ठेवलेली ५ गोवंश जातीची जनावरे ताब्यात घेतली आहेत. या जनावरांची एकूण किंमत १ लाख २५ हजार रुपये असून, याप्रकरणी एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २० डिसेंबरच्या मध्यरात्री करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना २० डिसेंबर रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार शहराच्या वॉर्ड क्रमांक ०२ मधील एका पडक्या घराच्या आडोशाला छापा टाकण्यात आला. तेथे चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता, केवळ कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयपणे बांधून ठेवलेली ५ लहान-मोठी गोवंश जनावरे आढळून आली. पोलिसांनी त्वरित ही जनावरे ताब्यात घेऊन १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.संशयित आरोपींविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण(सुधारणा) कायदा १९९५ (सुधारित २०१५) आणि महाराष्ट्र प्राणी छळ प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू त्रिभुवन करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!