लोकअदालतीत अपघातातील मयताच्या वारसांना १ कोटी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर
1 min read
अहिल्यानगर, दि.१८ :- जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एका मोटार अपघात दाव्यात तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांची विक्रमी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. अपघातात मयत झालेल्या महेश काठमोरे यांच्या वारसांना व विमा कंपनीमध्ये यशस्वी मध्यस्थी होऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
पाथर्डी तालुक्यातील शिरपूर येथील महेश तुकाराम काठमोरे (वय ३४) यांचा २० डिसेंबर २०२३ रोजी अहिल्यानगर – कल्याण महामार्गावर दुर्दैवी मृत्यू झाला होता. कुटुंबाचा आधार गमावल्याने त्यांच्या पश्चात पत्नी प्राजक्ता, अज्ञान मुले व वयोवृद्ध आई-वडील यांच्यावर मोठे संकट कोसळले होते.
या पार्श्वभूमीवर, वारसांना जलद न्याय व आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी हा खटला लोकअदालतीत ठेवण्यात आला होता.मयत काठमोरे यांच्या वारसांतर्फे विधिज्ञ सविता कथने यांनी ‘श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी’ विरुद्ध नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. यामध्ये विमा कंपनीची बाजू विधिज्ञ अशोक बंग यांनी मांडली.
दोन्ही बाजूंच्या वकिलांनी व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सामंजस्याने चर्चा करून १ कोटी ५ लाख रुपये देण्याचे मान्य केले.सदर तडजोडीचा धनादेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वारसांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी जिल्हा न्यायाधीश एम.एस. लोणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर आणि पॅनल सदस्य विधिज्ञ सुरेश लगड उपस्थित होते.
