यंदा श्री रंगदास स्वामी महाराज यात्रोत्सवात; ८० कढया आमटी; १५ लाख रुपयांचा मसाला
1 min read
आणे दि.९:- श्रीरंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी शतकोत्तर महोत्सव सोहळा श्री क्षेत्र आणे (ता. जुन्नर) येथे शनिवार दि.१३ पासून सुरू होत आहे. यावर्षी आलेल्या भाविकांना ८० कढाया आमटी केली जाणार आहे.
शनिवार पासून अखंड हरिनाम सप्ताह व सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष मधुकर दाते यांनी दिली.
या यात्रा उत्सवात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.गर्दी नियंत्रणासाठी यावर्षी ही आलेल्या भाविकांना देवस्थानने वेगळा उपक्रम राबवला असून ८० पैकी अंदाजे ४० कढया आमटीचे घरी वाटप करण्यात येणार असून त्यासाठी १५ लाख सोळा हजार ५४८ रुपयांचा मसाला लागणार आहे.
बी देवस्थानला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळाला असून श्रीरंगदास स्वामी पुण्यतिथीनिमित्त गेल्या १३७ वर्षांपासून हरिनाम सप्ताह आयोजित केला जात आहे. आलेल्या भाविकांना महाप्रसाद म्हणून आमटी-भाकरी केली जाते.
येथील आमटी भाकरीची चव जगभरात प्रसिद्ध असुन लाखो भाविक स्वामींच्या दर्शनाला व महाप्रसाद घेण्यासाठी येत असतात.
आसपासच्या गावांमधून भाविकांसाठी हजारो किलो भाकरी येत असतात. आलेल्या भाकरीचे वाजत गाजत स्वागत केलं जातं. देवस्थान परिसरात आमटी केली जाते. याचा लाभ दोन दिवसांत लाखो भाविक घेत असतात.शनिवारी सकाळी महापूजा व वीणापूजनाने होणार आहे.
सकाळी काकडा भूपाळी, सामुदायिक श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी प्रवचन, हरिपाठ, हरीकीर्तन, महाप्रसाद, जागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. सप्ताहाच्या कालावधीत हभप रामदास महाराज दाते, हभप प्रेमानंद महाराज शास्त्री आंबेकर, हभप सागर महाराज बोराटे, हभप वैजनाथ महाराज थोरात,
हभप संजय नाना धोंडगे, हभप ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली, हभप गोविंद महाराज गोरे यांचे कीर्तन होणार आहे.शनिवार (दि.२०) सकाळी ८ ते १० भजन, १० ते १२ श्री स्वामींच्या शाळिग्रामची मिरवणूक, १२ ते १ महाआरती होणार आहे.त्यानंतर भाविकांना आमटी-भाकरीचा महाप्रसाद दिला जाणार आहे.
सायंकाळी हभप भागवताचार्य चेतन महाराज शास्त्री यांच्या कीर्तनानंतर श्री स्वामींच्या पालखीची भव्य मिरवणूक होणार आहे. रविवार दि. २१ रोजी सकाळी हभप कृष्णकृपांकित डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांचे काल्याचे किर्तन होईल. त्यानंतर भाविकांना आमटी-भाकरीचा महाप्रसाद दिला जाणार आहे.

शनिवार दि.२० व रविवार दि.२१ रोजी भाविकांना आमटी भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
