राज्य महिला आयोगाच्या वतीने महिलांसाठी आयोजित ‘सक्षमा’ कार्यक्रमाचे उद्घाटन
1 min read
नागपूर दि.९:- राज्य महिला आयोगाच्या वतीने वनामती येथे महिलांसाठी आयोजित ‘सक्षमा’ कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यात मुले तसेच महिलांच्या सुरक्षेसह त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
गेल्या काळात अनेक नवीन योजना, उपक्रम आम्ही सुरु केले. राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी जेजे करणे आवश्यक आहे ते सर्व करु, याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.समाजाची प्रतिष्ठा महिलांच्या सुरक्षेवर अवलंबून असते.
महिला सुरक्षित नसतील तर समाज सक्षम होणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात महिला सुरक्षाविषयक बाबींमध्ये अनेक अमुलाग्र बदल केले. कालबाह्य कायदे रद्द करुन नवीन कायदे आणले आहेत. हे कायदे महिलांसाठी कवच कुंडले आहेत. या कायद्यातील तरतुदींची माहिती महिला आयोगामार्फत जनजागृतीच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहचवावी, असे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार मनिषा कायंदे, चित्रा वाघ, विक्रम काळे, मंजूळा गावित, सना मलिक,
आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवळे, आयोगाच्या माजी सदस्य निता ठाकरे आदी उपस्थित होते.विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, आपल्या समाजात महिलांना सर्वोच्च स्थान आहे, असे असतांना महिला असुरक्षित असल्याची कल्पना देखील दु:खदायक वाटते.
केंद्र आणि राज्य शासनाने महिलांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. भारतीय न्याय संहितेद्वारे महिलांच्या सुरक्षेसाठी महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. हे कायदे व त्यातील तरतुदी महिलांपर्यंत पोहचल्या पाहिजे. महिला आयोगाच्या ‘सक्षमा’ कार्यक्रमातून या तरतुदी महिलांपर्यंत पोहचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य महिला आयोगाचे होत असलेले काम कौतुकास्पद आहे. महिलासांठी नवनवीन कायदे व चांगल्या तरतुदी शासनाने केल्या आहेत. त्याची जनजागृती होणे गरजेचे आहे.
सक्षमा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पिडीत महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न होतील. महिलांना आपले अधिकार व असलेल्या कायद्यांची माहिती असली पाहिजे, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यावेळी म्हणाल्या.
