गोव्यात क्लबमध्ये भीषण आग लागून २३ जणांचा मृत्यू
1 min read
पणजी दि.७:- गोव्यातील अर्पोरा येथील बर्च बाय रोमियो लेन या क्लबमध्ये मध्यरात्री आग लागून २३ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बागा समुद्रकिनारी असलेल्या या क्लबमध्ये सिलिंडर स्फोटामुळे आग भडकली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आग लागल्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले, सकाळी पहाटेपर्यंत आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू होते.या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी संवाद साधला. राज्य सरकार बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे, असे त्यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदींनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “गोव्यातील अर्पोरा येथील आगीची दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपल्या कुटुंबियांना गमावले, त्यांच्याबद्दल संवेदना आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून घटनेची माहिती घेतली.
राज्य सरकार बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे.” घटनेस जबाबदार असलेल्यांवर कारवाई होणार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मध्यरात्री आग लागलेल्या क्लबला भेट दिली. “आजचा दिवस गोवा आणि आमच्यासाठी खूप दुःखद आहे. आर्पोरा येथील क्लबमध्ये आग लागून २३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शोकाकूल कुटुंबियांप्रती मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो. घटनास्थळी भेट दिली असून या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जे लोक या दुर्घटनेसाठी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
गोव्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनीही मध्यरात्री क्लबला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.त्यांनी सांगितले की, तळमजल्यावरील स्वयंपाकघरा पर्यंतच आग केंद्रित होती.आगीचे स्त्रोत आणि कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्वयंपाकघर परिसरातून जास्तीत जास्त मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
