शिक्षकांच्या आंदोलनामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील १७८६ शाळा बंद
1 min read
अहिल्यानगर दि.६:- शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्णची जाचक अट रद्द करावी, जुनी पेन्शन योजना कायम ठेवावी व इतर मागण्यांसाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी आज, शुक्रवारी शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
आंदोलनामुळे जिल्ह्यातील ३ हजार ४३३ प्राथमिक शाळांपैकी १ हजार ७८६ शाळा बंद होत्या. या शाळांमधील ५ हजार ५१४ शिक्षक आंदोलनात सहभागी होते. या सर्व शिक्षकांवर वेतन कपातीची कारवाई होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक, खासगी अनुदानित, अंशत अनुदानित, विना अनुदानित अशा सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलनाची हाक देत मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यावर शिक्षण संचालनालयाने आंदोलनात सहभागी होणार्यांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, शिक्षक संघटना आंदोलनावर ठाम होत्या. संचमान्यते मुळे ग्रामीण भागासह राज्यातील जवळपास २५ हजार शाळा बंद होणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गरज आहे. संचमान्यता आणि टीईटी बंधनकारक करण्याच्या निर्णयावर राज्य सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नाही.
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करता राज्यभरात शाळा बंद ठेवण्याचा निर्धार शिक्षकांनी व्यक्त केला होता. आज जिल्ह्यातील सुमारे दोन हजारावर शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी आमदार सत्यजित तांबे, संघटनांचे पदाधिकारी रावसाहेब रोहोकले, आबासाहेब जगताप, संजय धामणे, भाऊसाहेब चासकर, संजय कळमकर, अप्पासाहेब शिंदे, सुनील पंडित, महेंद्र हिंगे, बाबासाहेब बोडके आदी उपस्थित होते.
बंद शाळा व सहभागी शिक्षक
अहिल्यानगर १४० शाळा, ५३२ शिक्षक. नेवासा १२२ शाळा, ४४५ शिक्षक. पाथर्डी ५१ शाळा, १७१ शिक्षक. शेवगाव ४३ शाळा, १८२ शिक्षक. अकोले ३११ शाळा, ७८६ शिक्षक. पारनेर १७९ शाळा, ५३२ शिक्षक. संगमनेर २६२ शाळा, ८७२ शिक्षक.
श्रीगोंदा १२२ शाळा, ३२८ शिक्षक. कर्जत १०९ शाळा, १९८ शिक्षक, राहुरी १२८ शाळा, ३५१ शिक्षक. राहता ४१ शाळा, १९० शिक्षक. जामखेड १५० शाळा, ४६६ शिक्षक. कोपरगाव ९८ शाळा, २६५ शिक्षक. श्रीरामपूर ४० शाळा, १९६ शिक्षक.
एकूण १ हजार ७८६ शाळांतील ५ हजार ५१४ शिक्षक सहभागी झाले होते. या सर्व शिक्षकांवर वेतन कपातीची कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
