दोघा चोरट्यांकडून चोरीच्या २४ मोटरसायकली जप्त

1 min read

अहिल्यानगर दि.३०:- शहरातील कोतवाली पोलिसांनी दोघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल २४ मोटरसायकली हस्तगत केल्या. यामध्ये काही मोपेडचाही समावेश आहे. या मोटरसायकली विशिष्ट कंपनीच्या आहेत. बनावट चावीच्या सहायाने त्यांचे ‘हँडल लॉक’ चोरट्यांना सहज उघडले जात होते.कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी ही माहिती दिली. असिफ इक्बाल सय्यद (वय ३८, रंगार गल्ली, अहिल्यानगर, सध्या रा. आलमगीर, भिंगार, अहिल्यानगर) व आझाद उर्फ आज्या हरूण शेख (वय ३२, प्रबुद्धनगर, आलमगीर, भिंगार) अशी अटक केलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. या दोघांना उद्या, रविवारी न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. जप्त केलेल्या मोटरसायकलींची एकूण किंमत ६ लाख २५ हजार रुपये आहे.नगर शहर व परिसरात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याचा शोध घेण्याचे आदेश पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी गुन्हे शोध पथकाला दिले होते. या पथकाचे उपनिरीक्षक गणेश देशमुख व अंमलदारांनी विविध ठिकाणी चोरीस गेलेल्या मोटरसायकलच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने तांत्रिक विश्लेषण केले व संशयित निष्पन्न केले.प्रथम असिफ सय्यद याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने आझाद शेख याच्या मदतीने नगर शहर, नेवासा, भिंगार परिसरातून एकूण २४ मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली. असिफ सय्यद हा बनावट चावीच्या सहाय्याने मोटरसायकल चोरत असे.नंतर त्याची विक्री करण्यासाठी आझाद शेख याच्या कडे देत असे. आझाद याला जामखेडमधून ताब्यात घेण्यात आले. त्या दोघांनी मिळून चोरीची कबुली दिल्याचे निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.या मोटरसायकली दोघेजण अत्यंत कमी किमतीत विकत होते.अनेकदा विक्री केलेल्या मोटर सायकलचे कागदपत्रे आणून देतो असे सांगून,मिळेल ते पैसे घेऊन नंतर पोबारा करीत असत. काही मोटरसायकलींच्या मूळ मालकांचे व त्यांनी दिलेल्या तक्रारीची माहिती निष्पन्न करण्यासाठी कोतवाली पोलीसांकडून उप प्रादेशिक परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे नेतृत्वाखाली उपनिरीक्षक गणेश देशमुख, अंमलदार बाळकृष्ण दौंड, वसिम पठाण, शावीर शेख, विशाल दळवी, विनोद बोरगे, वाघचौरे, दिपक रोहकले, सत्यम शिंदे, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, अभय कदम, सुरज कदम, अमोल गाढे, अतुल काजळे, सचिन लोळगे, राम हंडाळ, अतुल शेंडे, अतुल लाटे, गुलाब शेख, मोबाईल सेल पथकाचे राहुल गुंडू यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!