पंतप्रधान मोदींनी पुणेकरांना दिली ९ हजार ८५७ कोटी रुपयांची भेट
1 min read
पुणे दि.३०:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (२६ नोव्हेंबर) पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) पुण्यातील विस्तारीत प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला या आणि नळ स्टाॅप-वारजे-माणिकबाग या चौथ्या (अ) मार्गिकेला मंजुरी देण्यात आली.
पुण्यातील मेट्रो विस्तारामुळे शहरातील पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंतचा प्रवास सुलभ आणि सुकर होणार आहे. प्रामुख्याने हडपपसर, मगरपट्टा परिसरातील आयटी कंपन्या, औद्योगिक आस्थापनांबरोबर, बाजारपेठा आणि सर्वसामांन्य पुणेकरांना याचा मोठा फायदा होणार आहे.
एकूण ३१.६४ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी ९,८५७.८५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पुढील पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला हा मार्ग २५.५२ किलोमीटर लांबीचा आहे. त्यासाठी २२ उन्नत स्थानके प्रस्तावित करण्यात आले आहे.
खराडी, हडपसर, मगरपट्टा आयटी पार्क या मार्गिकेवर असल्याने मोठा फायदा होणार आहेच. त्याबरोबर हडपसर, स्वारगेट, कर्वेनगर, वारजे आणि खडकवासला या दाट लोकवस्तीच्या व व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागांतील वाहतूक कोंडीत लक्षणीय घट होण्याचा अंदाज महामेट्रोकडून व्यक्त करण्यात आला आहे.
त्याचबरोबर नळ स्टाॅप- वारजे-माणिकबाग या ६.१२ किलोमीटर लांबीच्या मार्गावर सहा अन्नत स्थानके असणार आहेत. दोन्ही मार्गिकांमुळे शहराचा पूर्व, मध्य व पश्चिम-दक्षिण-पश्चिम भाग एकमेकांशी थेट जोडला जाणार असल्याचेह महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
‘प्रस्तावित मेट्रो मार्गिकांच्या प्रकल्पांना केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्याने आता निविदा प्रक्रिया तातडीने सुरूवात करण्यात येणार आहे. अंदाजे २०२९ पर्यंत टप्प्याटप्प्याने हे मार्ग प्रवाशांसाठी खुले करण्याचा मानस आहे. पुणे मेट्रोचा हा विस्तार शहराच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरेल आणि रोजच्या प्रवासात वेळ व इंधनाची बचत होईल,
असा विश्वास आहे.’- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो ‘मेट्रो मार्गिकांच्या विस्तारीत प्रकल्पांच्या मंजुरीबाबत अनेक महिन्या्ंपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. नगरविकास मंत्री मनोहर लाल खट्टर यांची नुकतीच भेट घेतली होती. पुणे मेट्रो शहराच्या चारही बाजूला विस्तारणार असून
पुण्याची सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेगवान होईल. वाहतूक कोंडी समस्या कमी होऊन पर्यावरण पूरक दळणवळण सुविधा उपलब्ध होणार आहे.’- मुरलीधार मोहोळ, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री ‘पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांना केंद्राची मिळालेली मंजुरी ही पुणेकरांसाठी मोठी दिलासा देणारी आणि विकासगती वाढवणारी मूलभूत पायरी आहे.
शहरातील पूर्व-पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम भागांना जोडणाऱ्या या मार्गिकांमुळे वाहतुकीचा ताण कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सर्वसमावेशक होणार आहे.दोन्ही मार्गिका विस्तारामुळे वाहतुकीचा वेग नव्या उंचीवर जाणार आहे.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते. ’ – माधुरी मिसाळ, नगरविकास विभाग, राज्यमंत्री.
