तलाठ्याच्या नोकरीचे आमिष दाखवून २६ लाखांची फसवणूक

1 min read

पाथर्डी दि.२९:- तालुक्यात तलाठी पदाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून २६ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी खांडगाव येथील सुरेश कोंडीराम पवार यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी सुरेश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा शेखर तसेच गावातील दिनकर मगर यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये तलाठी पदासाठी अर्ज भरला होता. याच दरम्यान लोहसर येथील राजेंद्र जगन्नाथ दगडखैर यांनी ‘माझा नातेवाईक महसूल विभागात मोठा प्रभावशाली आहे.’ असा दावा करून नामदेव रामराव मिसाळ (रा. खोकरमोह, ता. शिरूर, जि. बीड) याची ओळख करून दिली. ऑगस्ट २०२३ मध्ये खांडगाव येथे झालेल्या बैठकीत नामदेव मिसाळ यांनी प्रत्येकी १५ लाख रुपये घेतल्यास मुलांना तलाठी पदावर नक्की नियुक्ती मिळवून देऊ, असे आश्वासन दिले. दगडखैर यांनीही तुमचे पैसे मी स्वतः जबाबदारीने परत करेन असे हमी दिल्याने पवार व दत्तात्रय मगर यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.८ सप्टेंबर २०२३ रोजी पाडळशिंगी येथील सनराईज हॉटेलमध्ये दोघांना प्रत्येकी १० लाख (एकूण २० लाख) रुपये दिले. त्या वेळी मिसाळ यांनी पाच-पाच लाखांचे दोन हमीचे धनादेश दिले. त्यानंतर मार्च २०२४ मध्ये दगडखैर यांनी कामासाठी आणखी पैसे द्यावे लागतील असे सांगत प्रत्येकी ३ लाखांची मागणी केली. ही रक्कमही पवार व मगर यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केली. तलाठी भरती पूर्ण झाली; परंतु दोन्ही युवकांची नियुक्ती झाली नाही. पवार परिवाराने अनेकदा मागणी करूनही दोघेही काम होईल. पुढच्या जाहिरातीमध्ये नवकी सेटींग लावली आहे असे सांगून टाळाटाळ करत राहिले. शेवटी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पवार यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी नामदेव रामराव मिसाळ व राजेंद्र जगन्नाथ दगडखैर यांच्याविरोधात फसवणूक व विश्वासघाताचे आरोप नोंदवले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!