नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर

1 min read

पुणे दि.२९: नगर परिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पात्र मतदारांना मतदान करता यावे, यासाठी मंगळवारी (दि. २) सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.जिल्ह्यातील आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरुळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, राजगुरूनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे या नगर परिषदा तर वडगाव मावळ, माळेगाव बुद्रुक, मंचर या नगरपंचायतींच्या मतदारसंघांत सुट्टी असणार आहे. मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामानिमित्त संबंधित मतदारसंघाच्या बाहेर आहेत, त्यांनादेखील ही सुट्टी लागू राहणार आहे. केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील. येत्या मंगळवारी पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन डुडी यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!