पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाचे मूल्य रुजवणे आवश्यक:- कविता पवार

1 min read

निमगाव सावा दि.२७:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सलग्नित, श्री.पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, दिलीप वळसे पाटील कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास मंडळ विभाग अंतर्गत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्था प्रतिनिधी कविता पवार (पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष), महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी संविधानाचे पूजन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. कविता पवार यांनी आजच्या पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये आपल्या संविधानाच्या मूल्यांची रुजवन आणि जतन करणे हा संविधान दिन साजरा करण्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. भारतीय नागरिक आज जे सुख समाधानाचे जीवन जगत आहे यामागे महामानव, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा त्याग आहे.त्यांनी निर्माण केलेल्या संविधानामुळे आपल्याला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य मिळाले . त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण व त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हा दिवस आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम करून भारतीय संविधान तयार केले त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. संविधानाने घालून दिलेली मूल्य आत्मसात करून आचरणात आणण्याचे आवाहन त्यांनी केले.प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्वांनी नेहमी संविधानाप्रती आदर ठेवून संविधानाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आचरण करावे असा मोलाचा संदेश दिला. तसेच भारतीय संविधानाची कलमे आणि भारतीय संविधानाचे महत्त्व विशद केले.
प्रा. अजय ननवरे यांनी संविधानाच्या सरनामेचे वाचन केले. तसेच संविधानाबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमासाठी संस्था प्रतिनिधी मा.सौ कविता पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे ,सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.ज्योती गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.अनिल पडवळ यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!