यशवंतराव चव्हाण यांचे कार्य प्रेरणादायी:- डॉ. रमेश काशीदे
1 min read
निमगाव सावा दि.२७:- निमगाव सावा (ता. जुन्नर) भारताचे माजी उपपंतप्रधान,लोकशाहीची भक्कम पायाभरणी करणारे शिल्पकार आणि महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे प्रणेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. रमेश काशिदे (आण्णासाहेब वाघीरे महाविद्यालय ओतूर) यांच्या शुभहस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.डॉ. रमेश काशिदे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले
जातात.1960 च्या महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर महाराष्ट्राला स्थिर दिशा देण्याचे कार्य त्यांनी अत्यंत दूरदृष्टीने पार पाडले.यशवंतराव चव्हाण यांनी सर्व क्षेत्राच्या एकत्रित उभारणीसाठी विविध योजना राबविल्या. कृषी आणि सहकार ही त्यांनी राज्याला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे.
साखर, दूध, कापूस या सहकारी उद्योगामुळे ग्रामीण भागात रोजगार वाढविला व शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणल्या. जलसंधारण, पाटबंधारे, औद्योगिक वसाहती यासारखे प्रकल्प राज्यात उभारून राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात यशवंतराव चव्हाण यांनी उभारलेल्या प्रगत महाराष्ट्राच्या कार्याचा ध्यास घेऊन समाजासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग,
इतिहास विभाग आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने केला होता. या कार्यक्रमासाठी डॉ.रमेश काशीदे प्राचार्य प्रल्हाद शिंदे, सर्व विभागांचे विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
