बालदिनानिमित्त ‘तारे जमीन पर’; व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालपणाचा उत्सव!

1 min read

वडगाव कांदळी दि.१५:-विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, वडगाव कांदळी येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त ‘बालदिन उत्सव’ मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या प्रसन्न चेहऱ्यांनी व शाळेच्या रंगीबेरंगी वातावरणाने संपूर्ण परिसर बालपणाच्या उत्साहाने उजळून निघाला.कार्यक्रमाची सुरुवात करताना शाळेच्या शिक्षिका पुनम राऊत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून बालदिनाच्या औचित्याची माहिती दिली. त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा विद्यार्थ्यांना समजावून सांगत दिवसाच्या विशेषतेची ओळख करून दिली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे, समन्वयिका जयश्री कुंजीर, श्वेता कोकणे तसेच सर्व शिक्षक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर शिक्षिका रोहिणी कोरडे यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांसोबत चर्चेच्या माध्यमातून शिक्षिका प्रमिला डुंबरे‘ यांनी ‘ बालक हेच देशाचे भविष्य’ या विचाराची सुंदर मांडणी केली.विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्नोत्तरांद्वारे सहभाग नोंदविला.बालदिनाचे औचित्य साधत त्यांनी नेहरूजींच्या बालपणीतील एका प्रेरणादायी गोष्टीचे सुंदर आणि कलात्मक सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने ती गोष्ट ऐकत आनंद घेतला.कार्यक्रमाच्या अखेरीस विद्यार्थ्यांसाठी ‘तारे जमीन पर’ आणि ‘नरसिंहा ‘ हे चित्रपट दाखविण्यात आले. या चित्रपटांमधून विद्यार्थ्यांना हिंदू संस्कृती, देवादी देवतांचे महत्त्व, भारतीय इतिहास तसेच स्वप्नं, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे महत्त्व समजले.शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देत सांगितले की “प्रत्येक मुलात एक अद्भुत तेज दडलेले असते; त्याला ओळखून त्याला उजाळा देणे हेच शिक्षणाचे खरे सौंदर्य आहे.”या कार्यक्रमासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे आणि सीईओ दुष्यंत गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले. अशा रीतीने बालदिनाचा हा उत्सव आनंद, शिक्षण आणि सर्जनशीलतेच्या रंगांनी सजला. विद्यार्थ्यांनी हास्य, उत्साह आणि मैत्रीने भरलेला हा दिवस मनापासून अनुभवला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!