टीईटी परीक्षेत गैरप्रकार केल्यास थेट कारवाई

नाशिक दि.२३:– महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २३ नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होणार आहे. टीईटी परीक्षेत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे. परीक्षेत कोणी गैरप्रकार करताना आढळल्यास थेट फौजदारी कारवाई होणार आहे.महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते आठवी वर्गांवर नियुक्ती असलेल्या शिक्षकांना टीईटी (टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट) म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा देणे अनिवार्य आहे. या परीक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ४,७५,६६९ परीक्षार्थी आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील ३२०३१ परीक्षार्थी आहेत. राज्यातील ३७ जिल्ह्यांमध्ये १४२३ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. न्यायालयाने एक सप्टेंबर रोजी सर्व शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा सक्तीची करण्याचा निर्णय दिल्याने त्याविरोधात सर्व शिक्षक संघटना एकवटल्या होत्या. महाराष्ट्र राज्य कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे टीईटी सक्तीचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली होती. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुध्द महाराष्ट्र सरकारच्या वतीने पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याचे आश्वासन शिक्षक संघटनांना दिले होते. परंतु, राज्य सरकारतर्फे कोणत्याही हालचाली करण्यात न आल्याने टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २३ नोव्हेंबर रोजी होणारी टीईटी परीक्षा नाशिकमध्ये ५४ केंद्रांवर होणार असून केंद्र संचालक आणि उपकेंद्र संचालकांना या कालावधीत रजा घेण्यास मनाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. परीक्षा व्यवस्थितरित्या पार पडावी, यासाठी केंद्रसंचालक व उपकेंद्र संचालक असे ५४ जण नियुक्त करण्यात आले आहेत.परीक्षेच्या दिवशी म्हणजे २३ नोव्हेंबरला आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे २२ नोव्हेंबरला केंद्र संचालक आणि उपकेंद्र संचालकांना रजा घेता येणार नाही. या परीक्षेपूर्वी शिक्षण आयुक्तांनी नाशिक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन माहिती जाणून घेतली. काही सूचना केल्या. परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.गैरप्रकार होणार नाहीत, यासंबंधी दक्षता घेण्याचे आवाहन केले. परीक्षार्थीची संख्या वाढल्याने परीक्षा केंद्रांची संख्या यंदा वाढली आहे. नाशिकमधील विविध शाळा,महाविद्यालयातील ५४ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी काही उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यानुसार सर्व केंद्रांवर बायोमेट्रिक तपासणी, फेस रिकग्निशन करुनच परीक्षार्थींना केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे. छायाचित्रातील खोडसाळपणा ओळखण्यासह एआय तंत्रज्ञानाव्दारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. कोणी काही गैरप्रकार केल्यास फौजदारी करण्यात येणार आहे. परीक्षार्थींनी या सूचना लक्षात ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!