दोन दिवसांत पिंपरखेड येथे दोन बिबट्यांना जेरबंद

1 min read

जांबुत दि.२२:- शिरूरच्या बेट भागातील पिंपरखेड, जांबूत, फाकटे आणि परिसरात झालेल्या बिबट हल्ल्यांची दखल घेत वनविभागाच्या माध्यमातून विविध ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहे. मागील दोन दिवसांत पिंपरखेड येथे दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात आले असून गुरुवार (दि.२१) रोजी सायंकाळी फाकटे (ता.शिरूर) येथील वाळुंजवस्ती परिसरात शेतकरी योगेश वाळूंज यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात सहा वर्षीय नर संवर्गातील बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांच्या सुचनेवरून आणि शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी लहू केसकर , महेंद्र दाते यांनी हि कारवाई केली आहे.मागील पंधरा दिवसांपूर्वी फाकटे आणि परिसरात शेतकरी महेश टेके यांच्या कालवाडीवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते तर दररोज नित्याने धुमाकूळ घालणारा बिबट्या ग्रामस्थांच्या निदर्शनास येत होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शंकर पिंगळे, विकास दरेकर ,वैभव शेलार यांनी वनविभागाकडे केलेल्या मागणीवरून परिसरात तीन पिंजरे लावण्यात आले या पिंजऱ्यात हा बिबट जेरबंद करण्यात यश आले मात्र अजूनही या भागात बिबट्याचे वास्तव्य असून वनविभागाने अशाच प्रकारे कारवाई करून बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!