व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलच्या वृंदा गणिगाची उल्लेखनीय कामगिरी
1 min read
वडगाव कांदळी दि.२१:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी येथील विद्यार्थिनींनी विविध स्पर्धांमधून सातत्याने चमक दाखवत शाळेचा लौकिक अधिकाधिक उज्ज्वल केला आहे. या यशमालिकेत इयत्ता सातवीतील वृंदा गणिगा हिने भर घालत शाळेचा अभिमान पुन्हा एकदा वाढवला आहे.
नारायणगाव येथे आयोजित अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे घेण्यात आलेल्या मेमोरियल एलोक्यूशन स्पर्धेत वृंदाने प्रभावी वक्तृत्व,सुस्पष्ट उच्चारशैली आणि आत्मविश्वासपूर्ण मांडणीच्या जोरावर तृतीय क्रमांक पटकावून आपली विलक्षण प्रतिभा सर्वांसमोर सिध्द केली.
तिच्या भाषणातील सहजता, विषयांवरील पकड आणि आकर्षक सादरीकरणामुळे परीक्षकांनी तिच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.वृंदाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी वृंदाचे अभिनंदन करत म्हटले,
“आमच्या विद्यार्थ्यांकडून मिळणारी अशी गौरवशाली यशाची पावती ही शाळेच्या सर्वांगीण गुणवत्तेची साक्ष आहे. वृंदाने उत्कृष्ट वक्तृत्वकौशल्य दाखवत शाळेचा मान अभिमानाने उंचावला आहे.”तसेच विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व सीईओ दुष्यंत गायकवाड यांनीही वृंदाचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
