शेतमजुराची मुलगी सीए; जिद्द व चिकाटीच्या जोरावर निकिता दाते हिला यश

1 min read

आणे दि.८:- चार्टर्ड अकाउंटंट (सीए) या अत्यंत कठीण परीक्षेत आणे (ता. जुन्नर) येथील निकिता विष्णु दाते हिने उल्लेखनीय यश संपादन करून आई वडिलांचे व गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) मार्फत घेण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट व अंतिम परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेच्या अंतिम टप्प्यात निकिताने यश मिळवून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. निकिताचे वडील विष्णु दाते आणि आई दोघेही शेती व शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा कठीण आर्थिक परिस्थितीत निकिताने हार न मानता मेहनतीच्या जोरावर हे स्वप्न साकार केले. तिने आपले प्राथमिक शिक्षण सरदार पटेल हायस्कूल, आणे येथे पूर्ण केले. त्यानंतर आळे येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयात वाणिज्य शाखेत पदवी शिक्षण घेतले. या परीक्षेत ती महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणातही तिने श्रेणीत यश मिळविले. जिद्द,  कष्ट, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ग्रामीण भागातील कन्येने मोठे यश मिळविले असल्याची माहिती गावच्या सरपंच प्रियांका दाते यांनी दिली.या यशाबद्दल गावच्या सरपंच प्रियांका प्रशांत दाते, सरदार पटेल हायस्कूलचे प्राचार्य धोंडिभाऊ शिंदे अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. निकिताला मेहुणे आणे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर विष्णू आहेर, गावचे माजी सरपंच श्रीप्रकाश बोरा यांच शिक्षणासाठी मोलाचं सहकार्य लाभलं.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!