मंगरूळ व आळे येथे घरफोडी करणारे सराईत जेरबंद
1 min read
आळेफाटा दि.८:- आळेफाटा, नारायणगाव व मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणारे दोन सराईत चोरटे जेरबंद करण्यात आळेफाटा पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास यश आले. त्याच्याकडून सोन्या चांदीसह रोख रक्कम असा ८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
मोहन भिकाजी भोसले (वय २०) व किशोर हापूस भोसले (वय २०, दोघे रा. कासाटी, आष्टी, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगरूळ येथील विक्रम महादू डेरे यांच्या घराचे कुलूप तोडून ९ ऑक्टोबर रोजी दिवसा चोरट्यांनी साडेतीन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते.
याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.आळेफाटा पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे मोहन व किशोर यांना आळेफाटा येथे ताब्यात घेतले.
या दोघांनी मंगरूळ,चाळकवाडी तसेच आळे येथील घरातील चांदीचेमुकुट तसेच रोख पन्नास हजार रूपये, नारायणगाव व मंचर पोलिस ठाण्यांचे हद्दीत घरफोडी करत साडेतीन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीतील एकूण ७ तोळे सोन्याचे दागिने,
१८ तोळ्याचा चांदीचा मुकुट, रोख पन्नास हजार, दुचाकी असा साडे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.ही कामगिरी उपविभाग पोलिस अधिकारी धनंजय पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे विक्रम तापकीर,
दीपक साबळे, हेमंत विरोळे, संदीप वारे, अक्षय नवले, नीलेश सुपेकर व आळेफाटा ठाण्याचे सतीश टाव्हरे, अमित मालुंजे, विनोद गायकवाड, पंकज पारखे, नवीन आरगडे, गणेश जगताप, ओंकार खुणे यांनी केली.
