ऊसतोड कामगारांमध्ये मानव–बिबट्या संघर्षाविषयी जनजागृती
1 min read
बेल्हे दि.८:- वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीम संस्था, जुन्नर आणि वर्ड फॉर नेचर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड कामगारांमध्ये मानव–बिबट्या संघर्षाविषयी जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन ऊसतोडीच्या हंगामात वाढत्या बिबट्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले असून,
ऊसतोड कामगारांना बिबट्या आणि इतर वन्यजीवांच्या हालचालींबद्दल जागरूक करण्याचा उद्देश होता. कार्यक्रमामध्ये संस्थेचे संस्थापक आकाश माळी, उपाध्यक्ष दीपक माळी, हेमंत घाडगे तसेच वर्ड फॉर नेचरचे संस्थापक अध्यक्ष शुभम पांडे यांनी निसर्ग संवर्धनाचे महत्त्व आणि वन्यजीवांचे पर्यावरणातील योगदान याबद्दल सविस्तर माहिती दिली.
सर्पमित्र आकाश माळी आणि दीपक माळी यांनी ऊसतोड कामगारांशी संवाद साधत बिबट्याच्या हालचाली ओळखण्याचे मार्ग,सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना, आणि वन्यजीव आढळल्यास कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.
या उपक्रमाद्वारे ऊसतोड कामगारांमध्ये “मानव–बिबट्या सहजीवन” या संकल्पनेची जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमास कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. निसर्ग आपला मित्र आहे — त्याचे संवर्धन आणि संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
