राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. कृपाल पवार व डॉ. वसुधा पाटील यांचे ‘डिजिटल मार्केटिंग’ विषयावर नवे पुस्तक प्रकाशित

1 min read

कर्जुले हर्या दि.८:- राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, कर्जुले हर्या जिल्हा अहिल्यानगर येथील उपप्राचार्य व आयक्यूएसी (IQAC) प्रमुख डॉ. कृपाल पवार तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, नेप्ती, जि. अहमदनगर येथील कृत्रिम बुद्धिमत्ता व डाटा सायन्स (AIDS)विभागप्रमुख डॉ. वसुधा पाटील यांनी संयुक्तपणे “डिजिटल मार्केटिंग” या विषयावर आधारित एक उत्कृष्ट पाठ्यपुस्तक प्रकाशित केले आहे. हे पुस्तक प्रेस स्कॉलर पब्लिकेशन या नामांकित इंटरनॅशनल प्रकाशन प्रकाशित झाले असून ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अद्ययावत अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आले आहे.या पुस्तकामध्ये आधुनिक काळातील डिजिटल मार्केटिंगच्या सर्व महत्त्वपूर्ण अंगांचा सखोल ऊहापोह करण्यात आला आहे. सोशल मीडिया मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO), ई-मेल मार्केटिंग, वेब अ‍ॅनालिटिक्स, ऑनलाईन ब्रँडिंग आणि डिजिटल जाहिरात यांसारख्या विषयांवर सविस्तर विवेचन या पुस्तकात केलेले आहे. विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक नव्हे तर व्यावहारिक ज्ञान मिळावे, यासाठी या पुस्तकात उद्योगजगताशी संबंधित उदाहरणे, केस स्टडीज आणि अलीकडील ट्रेंड्सचा समावेश करण्यात आला आहे.हे पुस्तक अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी एक उपयुक्त शैक्षणिक साधन ठरणार आहे. डिजिटल युगातील उद्योजकता, विपणन धोरणे आणि तंत्रज्ञान यांचा परस्परसंबंध समजून घेण्यासाठी हे पुस्तक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास लेखकांनी व्यक्त केला आहे.या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे दोन्ही महाविद्यालयांतील प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. कृपाल पवार आणि डॉ. वसुधा पाटील यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. त्यांच्या या शैक्षणिक योगदानामुळे विद्यापीठ स्तरावर गुणवत्तापूर्ण शैक्षणिक साहित्य उपलब्ध होणार असून, नव्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल, असे सर्वांचे मत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!