पुणे-नाशिक महामार्ग ठप्प; नागरिकांचा उद्रेक; बिबट्याच्या तीन दिवसांत तीन घटना

1 min read

आंबेगाव दि.४:-शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि जांबुत गावांमध्ये सलग वीस दिवसांत तीन घातक बिबट्या हल्ल्यांमुळे भीती, असंतोष आणि संताप यांचा स्फोट झाला आहे. या हल्ल्यांमध्ये एका आजीसह दोन लहाग्यांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाले असून परिसरात दहशत निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोमवारी (दि. ३) मंचरजवळील गायमुख फाट्यावर पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून शासन आणि वनविभागाविरोधात संताप व्यक्त केला. सकाळी अकरा वाजता सुरू झालेलं आंदोलन लवकरच उग्र झालं. आंबेगाव, खेड, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांतील नागरिक, शेतकरी, महिला आणि युवक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले.आम्ही रोज मृत्यूच्या सावलीत जगतोय,पण वनविभाग निद्रिस्त आहे! असा नागरिकांचा आक्रोश आंदोलनस्थळी ऐकू येत होता. रस्ता रोकोमुळे पुणे-नाशिक महामार्गावर काही तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. ट्रक, बस, खासगी वाहने यांची लांबच लांब रांग लागली. स्थानिक पोलीस व महसूल प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र नागरिकांनी पालकमंत्री व वनमंत्री घटनास्थळी येईपर्यंत आंदोलन न मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासन अडचणीत सापडले.स्थानिक ग्रामस्थांचा रोष स्पष्ट जाणवत होता.आंदोलनस्थळी ग्रामस्थ,शेतकरी व महिलांनी घोषणाबाजी करत वनविभागाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली.ग्रामस्थांनी सांगितले, दर दोन दिवसांनी बिबट्याचा हल्ला, आणि वनविभाग फक्त पिंजरे लावल्याचे सांगतो. पण ना पिंजरे, ना प्रकाशयोजना, ना सुरक्षा उपाय लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.निवेदनं नकोत, कृती हवी! महिलांनीही आक्रोश व्यक्त करत सांगितले की, रात्र झाली की गाव निर्जन बनतं, लहान मुलं घराबाहेर पडू शकत नाहीत. शाळेत जाण्याचं धाडसही राहत नाही.या घटनेनंतर स्थानिक जनप्रतिनिधी, पंचायत समिती सदस्य आणि सामाजिक संघटनांनी एकमुखाने शासनावर
त्वरित कृती करण्याचा दबाव आणला आहे. बिबट्याच्या भीतीत जगणं म्हणजे माणुसकीचा पराभव आहे. सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा,अशी मागणी काही लोकप्रतिनिधींनी केली आहे. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट चेतावणी दिली की, जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर आम्ही अधिक मोठं आंदोलन छेडू. हा आमचा अंतिम संघर्ष असेल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!