रोहनचे नातेवाईक संतप्त; बिबट्याच्या बंदोबस्ताशिवाय रोहनचा मृतदेह ताब्यात घेणार नाही

1 min read

मंचर दि.४:- पिंपरखेड (ता. शिरूर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तेरा वर्षीय रोहन विलास बोंबे या बालकाच्या मृतदेहाचे मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन होऊन तब्बल २८ तास उलटले तरी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतलेला नाही. बिबट्यांचा बंदोबस्त झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, असा ठाम निर्णय नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घेतल्याचे समजते.

पिंपरखेड येथे घराच्या अंगणात उभा असलेला रोहन याच्यावर बिबट्याने झडप घालून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी रात्री ११ वाजून ५८ मिनिटांनी त्याचा मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. सोमवारी पहाटे पावणे दोन वाजता शवविच्छेदन करण्यात आले.

त्यानंतरही ग्रामस्थांनी वन खात्याच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदवत, पुणे नाशिक महामार्गावरील गायमुख फाटा येथे रस्ता रोको करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थ आणि नातेवाईकांचे म्हणणे आहे की, परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त झाला नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत.

त्यामुळे रोहनचा मृतदेह कोल्ड बॉक्समध्ये ठेवण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत रोहनचा मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयातच होता. दरम्यान, मुलाच्या मृत्यूने वडील विलास बोंबे यांना तीव्र मानसिक धक्का बसला असून त्यांच्यावरही मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात दोन पोलीस अधिकारी आणि आठ पोलीस कर्मचार्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!