शिरूर तालुक्याची समृद्धी चव्हाण ने पटकावले राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक
1 min read
शिरूर दि.३१:-नागपूर येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ मध्ये शिरूर तालुक्यातील कळवंतवाडी गावची समृद्धी अजय चव्हाण हिने आपल्या नेमबाजी कौशल्याचा उत्तुंग ठसा उमटवित १० मीटर पिप साईट एअर रायफल या प्रकारामध्ये ४१०.२ गुण मिळवत रौप्यपदक पटकावले आहे.
तिच्या या उल्लेखनीय यशामुळे आता तिची राष्ट्रीय शालेय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ साठी इंदूर (मध्यप्रदेश) येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड निश्चित झाली आहे.फक्त दीड वर्षांच्या अल्प कालावधीत नेमबाजी या आव्हानात्मक क्रीडाक्षेत्रात झपाट्याने प्रगती करत समृद्धीने राज्यस्तरापर्यंत मजल मारली आहे.
तिच्या या यशाबद्दल प्रशिक्षक शरद तरटे (युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लब, शिरूर) यांनी सांगितले की, “समृद्धीने अत्यंत कमी काळात सातत्याने मेहनत,शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राष्ट्रीय दर्जाची स्पर्धक म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.”यापूर्वीही समृद्धीने उत्तराखंड, भोपाळ, दिल्ली, केरळ
आणि पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चाचणी स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धा व राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत अनेकांची दाद मिळवली होती. तिच्या नेमबाजीतील अचूकता आणि शांतचित्त स्वभावामुळे ती सातत्याने गुणांच्या झेप घेत आहे.
तिला या प्रवासात आई-वडील आणि कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा लाभला असून त्यांनी तिच्या खेळाची आवड जोपासत तिला आवश्यक ते सहकार्य दिले आहे. समृद्धीच्या या यशाबद्दल गावकऱ्यांसह तालुक्यातील क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कळवंतवाडी या छोट्याशा गावातून उभी राहून राज्यस्तरावर चमक दाखविणाऱ्या समृद्धी चव्हाणने आता राष्ट्रीय स्तरावर पदक पटकावण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. तिच्या यशामुळे शिरूर तालुक्याच्या क्रीडाक्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.
