गुळूंचवाडीच्या जिल्हा परिषद शाळेचा चेहरा-मोहरा बदलण्यात शिक्षकांचे योगदान

1 min read

बेल्हे दि.१८:- गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा चेहरा – मोहरा बदलण्यात मोलाचे योगदान असलेल्या शिक्षकांची बदली झाल्याने, नुकतेच स्थानिक ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या वतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने संबंधित शिक्षकांना सन्मानपत्र प्रदान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.गुळूंचवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित कृतज्ञता सोहळ्यात, उपक्रमशील शिक्षक अशोक बांगर, उपशिक्षिका सरिता मटाले, नूरजहाँ पटेल या तीन आवडत्या शिक्षकांची बदली झाल्याने विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते. यावेळी संबंधित शिक्षकांशी अनेक वर्षांचा ऋणानुबंध असल्याने, ग्रामस्थांनीही गहिवरून आले होते. या कृतज्ञता  सोहळाप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुराडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  पोपटराव काळे, माजी अध्यक्ष रंगनाथ भांबेरे, विठ्ठल गुंजाळ, रेवननाथ गुंजाळ , कौसल्या फापाळे, सुभद्रा गुंजाळ, चंचल गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान शाळेच्या पायाभूत सुविधा, शिष्यवृत्ती परिक्षामधील यश व गुणवत्ता वाढीसाठी संबंधित शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतल्याने ग्रामस्थांच्या वतीने सन्मानपत्र प्रदान करून संबंधितांचे कौतुक करण्यात आले. या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक अशोक बांगर यांच्या कल्पकतेमुळे व यशस्वी पाठपुराव्यामुळे, इंम्पथी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने दोन कोटी रुपये उपलब्ध करून शाळेची दुमजली देखणी इमारत दिमाखात उभी आहे. यासाठी त्यांना इतर सहकारी शिक्षकांचेही मोलाचे सहकार्य मिळाले आहे. अशोक बांगर हे ता. २५ ऑगस्ट २००५ रोजी गुळूंचवाडी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले होते. नुकतीच त्यांची बदली बेल्हे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाली आहे.गुळूंचवाडी येथील विठ्ठलवाडी परिसरातील अनुसूचित जमातीच्या मुलांना शाळेची गोडी लागण्यासाठी, डोंगरदऱ्या व शेतीच्या बांधावर जाऊन त्यांनी मनापासून प्रयत्न केले. याठिकाणी पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी, अनुसूचित जमातीतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी व शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी, त्यांनी मुख्याध्यापक इतर शिक्षक सहकाऱ्यांच्या मदतीने यशस्वी पाठपुरावा केला. याठिकाणी संगणक लॅब, सौर ऊर्जा प्रकल्प यासारखे प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेतला. ठाकरवाडीचे नामकरण विठ्ठलवाडी करण्यासाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. दरम्यान ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी बदली झालेल्या सर्व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याने, संबंधित शिक्षकांचेही गळे दाटून आले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!