पिंपरखेडच्या बोंबे कुटुंबीयांची खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी घेतली भेट; जनआंदोलनाचा इशारा
1 min read
शिरूर दि.१५:- शिरूर तालुका व जुन्नर परिसरात गेल्या दहा दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे दोन निरागस चिमुकल्यांचा जीव जाण्याची दुर्दैवी घटना घडली आहे.शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाच वर्षांची शिवन्या बोंबे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला, तर काही दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथेही अशाच घटनेत आणखी एका चिमुकल्याचा बळी गेला.
या घटनांनी संपूर्ण परिसरात भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पिंपरखेड येथे भेट देऊन मयत शिवन्या बोंबेच्या कुटुंबाचे सांत्वन केले. या वेळी ते म्हणाले,“दहा दिवसांत दोन लेकरांचे जीव गेले, ही दुर्दैवी बाब आहे.
उपाययोजनेसाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही मुख्यमंत्री कृती आराखड्यासाठी वेळ देऊ शकत नाहीत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कबुतरांसाठी वेळ आहे, पण आमच्या लेकरांसाठी वेळ नाही, हे अत्यंत खेदजनक आहे.”या वेळी सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस आणि वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्याकडून घटनेची माहिती घेत
खासदार कोल्हे यांनी तातडीने बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या. स्मिता राजहंस यांनी “पिंजऱ्यांची संख्या कमी असल्याने अडचणी येत आहेत” असे सांगितले असता, कोल्हे म्हणाले,“एका चिमुकल्याचा जीव जाणे ही फार मोठी हानी आहे. ही भरून निघू शकत नाही. या संदर्भात पालकमंत्र्यांसोबत लवकरच मीटिंग आहे,
मी स्वतः त्यात उपस्थित राहणार आहे. उपाययोजनेसाठी तुम्हाला जे काही आवश्यक आहे ते निर्भीडपणे मांडा.” दरम्यान, ग्रामस्थांनी वनविभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “आमचा जीव महत्त्वाचा की बिबट्याचा? आमच्या लेकरांचं संरक्षण झालं पाहिजे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या भागातील गावकरी बेल्हे-जेजुरी राज्य मार्गावर येत्या गुरुवारी (दि.१६) मोठ्या जनआंदोलनाची हाक देणार आहेत. या आंदोलनाचा इशारा प्रफुल्ल बोंबे यांनी डॉ.अमोल कोल्हे, सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस, वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे आणि मंचर बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांच्या उपस्थितीत दिला.
या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दुःख, राग आणि असुरक्षिततेची भावना स्पष्ट दिसत होती.
