बिबट्याच्या हल्यात पाच वर्षीय शिवन्या बोंबेचा दुर्दैवी मृत्यू
1 min read
बिबट्याच्या हल्यात पाच वर्षीय शिवन्या बोंबेचा दुर्दैवी मृत्यूपिंपरखेड दि.१२:- पिंपरखेड (ता.जुन्नर) गावात रविवारी (दि.१२) भरदिवसा बिबट्याने केलेल्या अचानक हल्ल्यात शिवन्या शैलेश बोंबे या साडेपाच वर्षांच्या लहान मुलीचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली आहे.
पिंपरखेड येथील शेतकरी अरुण देवराम बोंबे यांच्या घरामागे त्यांच्या शेतात जेसीबीचे काम चालू होते. या कामाच्या ठिकाणी त्यांचे नात शिवन्या शैलेश बोंबे ही आजोबा अरुण बोंबे यांना पिण्यासाठी पाणी घेऊन जात होती. घरापासून जवळच असलेल्या एका चार फूट उंचीच्या ऊसाच्या शेतात एक बिबट्या दबा धरून बसला होता.
शिवन्या पाणी घेऊन जात असतानाच, दबा धरून बसलेल्या त्या बिबट्याने अचानक तिच्यावर जोरदार झडप घातली. बिबट्याने शिवन्याला तोंडात पकडले आणि तो तातडीने ऊसाच्या शेतात शिरला.सुमारे २०० फूट अंतरावर असलेल्या आजोबा अरुण देवराम बोंबे यांनी हा थरार पाहिला.
आपल्या चिमुकल्या नातीवर बिबट्याने हल्ला केल्याचे पाहताच, क्षणाचाही विलंब न लावता ते जीवाच्या आकांताने बिबट्याच्या दिशेने धावले.जीवाची पर्वा न करता अरुण बोंबे यांनी ऊसात शिरलेल्या बिबट्याच्या दिशेने धाव घेतली आणि मोठ्या हिंमतीने बिबट्याच्या तावडीतून शिवन्याला सोडवले.
बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे बोंबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
