प्राथमिक आरोग्य केंद्रात घुसला विषारी नाग; सर्पमित्र आकाश माळीने दिले नागाला जीवदान
1 min read
पिंपळवंडी दि.८:- पिंपळवंडी (ता.जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दुपारी १ वाजता पाच फुटी विषारी नाग साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. तत्काळ घटनेची माहिती वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीम चे अध्यक्ष व सर्पमित्र आकाश माळी यांना देण्यात आली.आकाश माळी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत साप सुरक्षितरीत्या पकडून त्याला जीवनदान दिले. नाग विषारी असल्याने परिसरातील नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवत बचाव कार्य पाहिले. आकाश माळी यांनी अत्यंत कौशल्याने साप पकडून त्याला कोणतीही इजा न होता जंगलात सोडून दिल्याचे सांगण्यात आले.
वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीमच्या या तत्पर आणि संवेदनशील कामगिरीचे नागरिकांनी कौतुक केले असून, “अशा सर्पमित्रांमुळे गावोगावी जनजागृती होत आहे आणि सापांबाबतचा गैरसमज दूर होत आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
सर्पमित्र आकाश माळी यांनी सांगितले की, “साप हे निसर्गातील संतुलन राखणारे प्राणी आहेत. त्यांना मारू नये, तर सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडावे,” असे आवाहन त्यांनी केले.