समर्थ आय.टी.आय मध्ये रंगला गुणगौरव सोहळा
1 min read
बेल्हे दि.८:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, बेल्हे येथे प्रशिक्षणार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ शैक्षणिक संकुलाचे कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत होते तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योग क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व दिनेश बडगूजर,लियाजनींग ऑफिसर अँड ॲडव्हाईजर व कल्पेश दौंडे,अप्रेंटिस विभाग मुंगी इंजिनिअर्स प्रा.लि.चाकण पुणे आदि मान्यवर अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली.या सोहळ्यात संस्थेतील विविध विभागातील गुणवान,मेहनती आणि विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
प्रमुख अतिथिंनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे,तांत्रिक शिक्षणाचे आणि उद्योग क्षेत्रातील संधीचे महत्त्व पटवून दिले.त्यांनी सांगितले की कौशल्य आणि आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे.समर्थ आय.टी.आय मधील विद्यार्थी निश्चितच भविष्यात समाजाच्या विकासात मोलाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्राचार्य पांडुरंग हाडवळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले की समर्थ आयटीआय नेहमीच गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रयत्नशील असते. संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,
माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद,प्रशिक्षक आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी साबळे यांनी तर विष्णू मापारी यांनी सर्वांचे आभार मानले.