शिवसेना पक्षचिन्हाचा अंतिम फैसला आज? शिंदे की ठाकरे? सर्वोच्च न्यायालय कुणाला देणार धक्का?

1 min read

मुंबई दि.८:- शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण या चिन्हावर गेले अनेक दिवस सुरू असलेल्या संघर्षावर आज 8 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह दिल्याचा जो निर्णय दिला होता, त्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ठाकरे गटाची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी ही माहिती दिली आहे. राज्यात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन ठाकरे गटाने जुलै महिन्यात अंतरिम अर्ज दाखल करत शिंदे गटाला चिन्हाचा वापर करण्यापासून रोखण्याची मागणी केली होती. या अर्जाची दखल घेताना न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी या प्रकरणावर तातडीने अंतिम निकाल देण्याचे संकेत दिले होते. “या प्रकरणाला 2 वर्षे झाली आहेत, त्यामुळे आम्ही एकदाच काय तो निकाल देऊ,” असे निरीक्षण मागील सुनावणीवेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी नोंदवले होते. यावरून हे प्रकरण लवकरात लवकर संपवण्याची न्यायालयाची भूमिका स्पष्ट होते. फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि चिन्ह दिले होते. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमध्ये यावरून संघर्ष सुरू आहे. जर आज या पक्षचिन्हावर अंतिम निकाल जाहीर झाला, तर त्याचा थेट परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर होणार आहे. हा निकाल कोणत्या गटाच्या बाजूने लागतो ? आणि शिवसेनेचा वारसदार कोण ठरणार ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!