कफ सिरपने घेतला नऊ बालकांचा बळी

1 min read

मध्यप्रदेश दि.५:- मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये जेनेरिक कफ सिरप खोकल्याचे औषधे घेतल्यानंतर तब्बल नऊ मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर ड्रग कंट्रोलर विभागाने तत्काळ कारवाई करत या औषधांच्या वापरावर बंदी घातली असून, नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.शिवम (९), विधी (६), अदनान (६), उसैद (९), ऋषिका (१०), हेतांश (११), विकास (९), चंचलेश (८) आणि संध्या
भोसोम (७) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात ७ सप्टेंबरपासून किडनी आजाराने ग्रस्त असलेल्या सात मुलांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यात गुरुवारी रात्री नागपूर येथे उपचार घेत असलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणातील मृतांची संख्या नऊ झाली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सध्या छिंदवाडा आणि नागपूरमध्ये आठ मुलांसह १३ मुले उपचार घेत आहेत. यात नागपूरमधील पाचपैकी तीन जण डायलिसिसवर आहेत, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय इतर अनेक मुले या सिरपमुळे गंभीर आजारी पडल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत.यापूर्वीही मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. राजस्थान सरकारने तातडीने तपासासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. विशेष म्हणजे या औषधाच्या २० हून अधिक बॅचवर बंदी घातली असून तपासणी सुरू आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात उपचार घेतलेल्या ४,६५८ मुलांचे नमुने गोळा केले होते, त्यापैकी ४,४११ सामान्य आढळले. डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या मुलांचे नमुने देखील तपासले जात आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!