मोबाईलवर मिळणार एसटीचे लोकेशन महामंडळाकडून ‘आपली एसटी’ ॲपचे दसऱ्याला लोकार्पण
1 min read
मुंबई दि.५:- प्रवाशांना घरबसल्या आपल्या एसटी बसथांब्यावर बस किती वाजता येणार, सध्या कोणती बस कुठे आहे, याची अचूक माहिती प्रवाशांना एका क्लिकमधून मिळणार आहे. त्यामुळे एसटीची वाट पाहण्यापासून प्रवाशांना दिलासा मिळणार असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या ‘आपली एसटी’ या नवीन ॲपचे लोकार्पण दसऱ्याच्या मुहूर्तावर झाले.
राज्यातील १२ हजारांपेक्षा अधिक बसेस व राज्यभरातील एक लाखपेक्षा जास्त मार्गाचे मॅपिंग करून हे ॲप विकसित केले आहे. भविष्यात लाखो प्रवासी याचा वापर करणार असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्यास, प्रवाशांनी त्या जरूर सूचित कराव्यात, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
त्यामध्ये पुणे विभागातील एसटींचा समावेश आहे. आपली एसटी (Aapli ST) असे मराठमोळे नाव परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले असून, रोजमाल्टा ऑटोटेक लि. या कंपनीच्या साहाय्याने विकसित केलेल्या अॅपमुळे प्रवाशांना आपल्या जवळच्या बसस्थानकाची माहिती मिळवू शकणार आहे.
त्यामध्ये प्रवासी माहिती केंद्राद्वारे बस कुठून सुटणार आणि ती बस थांब्यावर किती वाजता पोहोचणार याची वस्तुस्थिती माहिती मिळेल. त्यामुळे प्रवाशांना तासन् तास थांबावे लागणार नाही. थेट बस उपलब्धतेनुसार प्रवाशी थांब्यावर पोहोचू शकतील. तसेच प्रवाशांना आपल्या जवळच्या बस थांब्याचा शोध घेणे,
दोन थांब्यांदरम्यान चालणाऱ्या बसच्या वेळापत्रकाची माहिती पाहणे, आरक्षण केलेल्या तिकिटातील बस क्रमांक अथवा सेवा क्रमांक टाकून बसची थेट मागोवा (लाईव्ह ट्रॅकिंग करणे) घेणे या गोष्टींचा अॅपमध्ये समावेश आहे. तसेच, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अॅपमध्ये आपत्कालीन क्रमांकांची यादीदेखील देण्यात आली असून,
एका क्लिकमध्ये कोणत्याही आपत्कालीन क्रमांकावर कॉल करता येणार आहे. हे अॅप MSRTC commuter app या नावाने प्ले स्टोअरमधून प्रवाशांना डाऊनलोड करून घेता येईल. तथापि, आपली एसटी (Aapli ST) हे नाव लवकरच प्ले स्टोअरमध्ये दिसू लागेल.
सध्या या अॅपवर राज्यातील तब्बल १२,००० हून अधिक बसेसचे लाईव्ह डेटा उपलब्ध आहे. भविष्यात सर्व बसेस या अॅपच्या कार्यकक्षेत येतील.
