व्ही. जे. इंटरनॅशनल मध्ये नवरात्र उत्सवात दांडियाचा जल्लोष
1 min read
वडगाव कांदळी दि.५:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, वडगाव कांदळी येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दांडिया सेलिब्रेशन जल्लोषात साजरे करण्यात आले. पारंपरिक उत्साह, रंगतदार वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण शाळा उत्सवाच्या रंगांनी उजळून निघाली.
कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता सातवी मधील कुमारी नव्या सोनवणे व कुमारी जितिशा जाधव या विद्यार्थिनींनी केली. त्यांनी नवरात्र उत्सवाचे महत्त्व तसेच दांडिया रास या पारंपरिक लोकनृत्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांच्या माहितीपर भाषणाने विद्यार्थ्यांच्या मनात नवरात्र उत्सवाचे सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व अधिक दृढ झाले.
यानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी दांडिया सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले. नवरात्र उत्सवाची रंगत वाढविण्यासाठी लहानांपासून मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख घालून दांडियाचा मनमुराद आनंद लुटला. शाळेचे प्रांगण उत्साह, नृत्याची तालधून आणि टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेले.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे, समन्वयिका जयश्री कुंजीर व श्वेता कोकणे तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होत कार्यक्रम अधिक रंगतदार केला.
दांडिया सेलिब्रेशनच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये परंपरांचे जतन, एकोप्याची भावना व सांस्कृतिक मूल्यांची जपणूक झाली. या कार्यक्रमासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व सीईओ दुष्यंत गायकवाड यांचे विशेष प्रोत्साहन लाभले.
