स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत; ‘या’ महिन्यात आचार संहिता
1 min read
मुंबई दि.१८:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्यात येणार आहेत. ज्यामुळे राज्यात सुमारे तीन महिने आचारसंहिता लागू राहणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता आहे.
सर्वात आधी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्यानंतर नगरपालिका आणि शेवटी महापालिका निवडणुका अशा क्रमाने या निवडणुका होणार आहेत. या प्रक्रियेमुळे अनेक विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात काही महत्त्वाच्या याचिका न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे या निवडणुकांचा निर्णय सध्या कोर्टाच्या हातात आहे.
याचिकाकर्त्यांनी जिल्हा परिषद गटांचे आरक्षण चक्रानुक्रमे न करता नव्याने निश्चित करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. या याचिकांवर येत्या आठ ते दहा दिवसांत निकाल लागल्यास जिल्हा परिषदांच्या निवडणुकाच आधी घेतल्या जातील अशी अपेक्षा आहे. मात्र जर कोर्टाचा निर्णय येण्यास उशीर झाला.
तर राज्य निवडणूक आयोगाने आधी नगरपालिकांच्या निवडणुका घेण्याचा पर्याय तयार ठेवला आहे. निवडणुका टप्प्याटप्प्यात होणार असल्याने एकाच वेळी संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू होणार नाही ज्यामुळे आचारसंहिता नसलेल्या भागांत सरकारला धोरणात्मक निर्णय घेणे शक्य होईल.
दरम्यान 8 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता सुरू असतानाही अधिवेशन घेण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नाही.
मात्र ज्या भागांत निवडणुका आहेत, तेथील मतदारांना प्रभावित करतील असे कोणतेही धोरणात्मक निर्णय अधिवेशनात घेता येणार नाहीत असे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी स्पष्ट केले आहे.
