भरदिवसा दरोडा टाकून शेतात लपलेले चोरटे जेरबंद; ड्रोनने पोलिसांकडून शोध
1 min read
पुरंदर दि.१४:- वाल्हे (ता.पुरंदर) नजीक दौंडज येथे सिनेस्टाईल पाठलाग करून चोरट्यांना जेरबंद करण्यात आले आहे.भरदिवसा घरात दरोडा टाकून पळून चाललेल्या चोरांना ग्रामस्थ आणि पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले. दरम्यान चोरांना पकडण्यास गेलेल्या तरुणांना पिस्तूलचा धाक दाखवून पोबारा करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे यांच्या हत्यार बंद चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतले आहे. लखनसिंग रतपूतसिंग दुधाने, देहडसिंग कल्याणे, रत्नेश राजकुमार पुरी (तिघे रा. संभाजीनगर), अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.
जेजुरी कार्यक्षेत्रात शनिवारी दुपारी दौंडज गावामध्ये एका वस्तीवर दरोडा टाकून तीनचोरांनी पोबारा केला होता. मात्र, तरुणांनी त्यांच्या पाठलाग सुरु केला. थोपटेवाडी रेल्वे गेट बंद असल्याने चोरांची अडचण झाली. यादरम्यान दौंडजपासून चोरांचा पाठलाग करीत आलेल्या तरुणांनी चोरांना पकडले.
मात्र, तरुणांना पिस्तूलचा धाक दाखवून दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तर वाहन चालकाला त्यांनी पकडून ठेवले. दरम्यान, ही माहिती जेजुरी पोलिसांना मिळताच प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे, पीएसआय सर्जेराव पुजारी यांनी टीमसह घटनास्थळाकडे धाव घेतली.
ते जेऊरदरम्यानच्या रस्त्याच्याकडेला असलेल्या शेतामध्ये हे चोर लपूनबसले होते. यावेळी जेऊर पिसुर्टी, पिंपरे, नीरा या गावातील दीडशे ते दोनशे तरुण तिथे आले. संपूर्ण शेतीला वेढा घालून उभे राहिले. त्यामुळे चोरांना पळून जाणे शक्य झाले नाही.
पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण शेतीचा सर्व्हे केला. उसाचे क्षेत्र असल्याने पोलिसांना चोरांना शोधणे अवघड होते. ड्रोनच्या कॅमेऱ्यामध्ये हे चोर उसाच्या शेतामध्ये असल्याचे दिसून आले. पोलीस आणि तरुणांनी चोरांच्या मुसक्या आवळल्या.
जेजुरी पोलिसांनी चोरांना ताब्यात घेतले आहे. पोलीस टीममध्ये संदीप मदने, केशव जगताप, संदीप भापकर विठ्ठल कदम, दशरथ बनसोडे, रविराज कोकरे, घनश्याम चव्हाण, प्रसाद कोळेकर आदींनी सहभाग घेतला.
