जातेगाव बुद्रुक ग्रामसभेत दारूबंदीचा ऐतिहासिक निर्णय
1 min read
शिक्रापूर दि.१४:- दिवसेंदिवस दारुणे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) ग्रामपंचायतीने दारूविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, गावात दारू विकताना आढळल्यास संबंधिताला २५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल
आणि ही दंडाची रक्कम शाळेच्या विकासासाठी वापरली जाईल, असा महत्त्वपूर्ण ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे.गावात स्टिंग थंड पेय विक्रीवर बंदी घातल्यानंतर ग्रामपंचायतीने नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच निलेश उमाप,
पोलीस पाटील चित्रकला इंगवले, ग्रामपंचायत अधिकारी एल. डी. ठुबे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दारूविक्री करणाऱ्यांना बोलावून घेतले.निर्णयाची माहिती देऊन दारू न विकण्याची शपथ देण्यात आली. याशिवाय, दारू विक्री केल्यास पंचवीस हजार रुपयांचा दंड भरण्याची तयारी असल्याचे शपथपत्रही त्यांच्याकडून लिहून घेण्यात आले.
या निर्णयाबाबत बोलताना सरपंच निलेश उमाप यांनी सांगितले की, गावात कोणीही दारू विकताना आढळल्यास त्यांच्याकडून पंचवीस हजार रुपये दंड वसूल केला जाईल. ही रक्कम थेट गावातील शाळेच्या विकासासाठी वापरली जाईल, जेणेकरून गावाच्या प्रगतीला चालना मिळेल. या निर्णयाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
