स्मार्ट व्हिलेज पारगाव’ सन्मान सोहळ्यात मान्यवरांचा गौरव
1 min read
पारगाव तर्फे आळे दि.८:- मोरया प्रतिष्ठान नेहरमळा पारगाव यांच्या वतीने आयोजित “स्मार्ट व्हिलेज पारगाव- विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान सोहळा 2025” मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गावातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा मोरया प्रतिष्ठान नेहरमळा गणेशोत्सव समितीच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला.या सोहळ्यात वित्त लेखाधिकारी बाळासाहेब तट्टू, वैद्यकीय सेवेत कार्यरत डॉ. आशिष चव्हाण, केवळ 23 व्या वर्षी न्यायाधीश बनलेले आकाश हरिभाऊ तट्टू, पीएसआय रवीना डुकरे, आदर्श सरपंच लता चव्हाण, पाटबंधारे विभागाचे सुभाष झिंजाड, प्रगतशील शेतकरी रामदास चव्हाण,
सिनेअभिनेता केशव डुकरे व गाडामालक मयूर डुकरे यांचा सन्मानपत्र, शाल व आंबा रोप देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास विघ्नहर सहकारी साखर कारखानाचे चेअरमन सत्यशील शेरकर, बाजार समितीच्या संचालिका प्रियांका शेळके, चंदा गाडगे, संतोष येवले, संभाजी चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
दरवर्षी मोरया प्रतिष्ठान वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, रक्तदान, प्रेरणादायी व्याख्याने, महिलांसाठी होम मिनिस्टर, प्रश्नमंजुषा असे सामाजिक उपक्रम राबवत असते. यावर्षी प्रथमच गावातील मान्यवरांचा विशेष सन्मान सोहळा घेण्यात आला. हा उपक्रम दर वर्षी सुरु ठेवण्यात येणार आहे असं मंडळाचे कार्याध्यक्ष सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक विकास चव्हाण यांनी सांगितले.
प्रियांका शेळके यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “अशा कार्यक्रमांमुळे गावातील मान्यवरांचा गौरव होतोच पण तरुणाईसाठी प्रेरणादायी आदर्शही निर्माण होतो. प्रत्येक मंडळाने असा आदर्श घ्यावा.” तसेच न्यायाधीश आकाश तट्टू व पोलीस उपनिरीक्षक रवीना डुकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दत्तात्रय चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक संस्थापक अक्षय सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व मोरया प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विकास चव्हाण यांनी मानले.
या वेळी मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वप्निल सोनवणे, उपाध्यक्ष साहिल डुकरे, खजिनदार पवन चव्हाण, मार्गदर्शक डॉ. दत्तात्रय चव्हाण, संजय ढेरंगे यांच्यासह परिसरातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.