आंतर-हाऊस वादविवाद स्पर्धेत विद्यानिकेतनचा ‘अर्थ हाऊस’ अव्वल
1 min read
साकोरी दि.५:- विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी, साकोरी, ता. जुन्नर येथे आंतर-हाऊस वादविवाद स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांवर जोरदार युक्तिवाद सादर केले. स्पर्धेचे आयोजन शिक्षक दिग्विजय जारकड यांनी केले होते.तासभर चाललेल्या चुरशीच्या स्पर्धेत ‘अर्थ हाऊस’ने अचूक मुद्दे, स्पष्ट मांडणी आणि ठाम आत्मविश्वासाच्या जोरावर विजेतेपद आपल्या नावावर केले.‘फायर हाऊस’ने आगीसारखा उत्साह दाखवत उपविजेतेपद पटकावले, तर ‘वॉटर हाऊस’ने शांत पण सखोल विचार मांडत तिसरे स्थान मिळवले.
‘एअर हाऊस’च्या विद्यार्थ्यांनीही आपल्या झंझावाती वक्तृत्वाने प्रेक्षकांची दाद मिळवली.स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अहिरे प्रवीण, हडवळे अनिता, औटी संगीता आणि कर्डिले गणेश यांनी काम पाहिले. तसेच, या स्पर्धेत प्रत्येक ‘हाऊस’ च्या हाऊस मास्टर्सनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यात फायर हाऊससाठी . प्रतिभा गाडगे, वॉटर हाऊससाठी कविता भगत, अर्थ हाऊससाठी अपेक्षा पोळ आणि एअर हाऊससाठी दीपाली ढवळे यांनी विशेष परिश्रम घेतले.या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये वादविवाद कौशल्ये, तर्कशुद्ध विचार आणि सार्वजनिक बोलण्याचे धाडस विकसित करणे हे होते.
यावेळी शाळेच्या प्राचार्या रुपाली पवार -भालेराव यांची विशेष उपस्थिती होती. शाळेच्या प्राचार्या रुपाली भालेराव यांनी विजेत्यांचा सत्कार करताना विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले. त्या म्हणाल्या,
“स्पर्धा केवळ जिंकण्यासाठी नसते, तर शिकण्यासाठी असते. वेगवेगळ्या मतांचा आदर करणे, त्यातून नवीन विचार आत्मसात करणे, हेच खरे शिक्षण आहे. आज तुम्ही दाखवलेले धाडस, स्पष्टता आणि संवादकौशल्य हीच तुमची खरी शिदोरी आहे.”
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळते आणि शाळेच्या शैक्षणिक वातावरणात उत्साहाचे नवे रंग भरले जातात, असा सर्वांचा एकमुखी प्रतिसाद होता.