गटशिक्षणाधिकाऱ्यांची बेल्हे जिल्हा परिषद शाळेला भेट
1 min read
बेल्हे दि.४:- जुन्नर तालुक्याचे नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर – १ शाळेला सखोल भेट दिली. समवेत शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे, नवनियुक्त केंद्रप्रमुख शंकर सोनवणे उपस्थित होते. भेटी अंतर्गत बेल्हे केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांच्या सहविचार सभेमध्ये सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करून गुणवत्तेबाबत ,शालेय अडीअडचणी बाबतही सखोल चर्चा करण्यात आली. शालेय पोषण अधीक्षक विष्णू धोंडगे यांनी शालेय पोषण आहार योजना बाबत मार्गदर्शन केले.
शाळेमध्ये सुरू असलेले मिशन बर्थडे, संगणक शिक्षण, स्पर्धा परीक्षा तयारी,स्वतंत्र ग्रंथालय इ. उपक्रमांची माहिती उपशिक्षक हरिदास घोडे यांनी दिली. या उपक्रमांचे कौतुक करत मान्यवरांनी शाळेमध्ये आदर्श शाळा अंतर्गत सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली. इयत्ता पहिलीच्या वर्गाला भेट देत गुणवत्तेबाबत सखोल मार्गदर्शन केले.
शाळेचे उपशिक्षक संतोष डुकरे हे सेट परीक्षा २०२५ उत्तीर्ण झाले बद्दल त्यांचा सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच विलास पिंगट यांची बेल्हे येथे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक म्हणून नेमणूक झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.याप्रसंगी बेल्हे केंद्रातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
शाळेला भेट देऊन मार्गदर्शन केल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रितम मुंजाळ यांनी गटशिक्षणाधिकारी यांचा सन्मान केला. तसेच शंकर सोनवणे यांची बेल्हे केंद्रप्रमुख म्हणून नवीन नेमणूक झाल्याने त्यांचा सन्मान याप्रसंगी करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका मिरा बेलकर व ढगेमळा शाळेचे उपशिक्षक महादू कुरकुटे यांनी सर्वांचे आभार मानले.